लैंगिक संबंधांनंतर आनंदी किंवा निवांत वाटण्याऐवजी अचानक रडू येणे किंवा उदास वाटणे ही गोष्ट अनेकांसाठी गोंधळात टाकणारी असते. मात्र, मानसशास्त्रात या स्थितीला ‘पोस्ट-कोइटल डिस्फोरिया’ (Post-coital Dysphoria – PCD) असे म्हणतात. क्लिनिकल सायकॉलॉजिस्टच्या मते, ही एक वैज्ञानिक प्रक्रिया असून याला सामान्य भाषेत ‘पोस्ट सेक्स ब्लूज’ असेही संबोधले जाते.
PCD म्हणजे नक्की काय आणि ते कोणाला होऊ शकते?
संमतीने शरीरसंबंध ठेवल्यानंतरही काही व्यक्तींना अचानक रिकामेपण, दुःख किंवा रडू येण्याची भावना दाटून येते. हे केवळ महिलांच्या बाबतीतच घडते असे नाही, तर पुरुषांमध्येही ही लक्षणे दिसू शकतात. विशेषतः ज्या व्यक्तींनी भूतकाळात लैंगिक छळाचा (Sexual Assault) सामना केला आहे, त्यांच्यामध्ये ही स्थिती अधिक प्रकर्षाने जाणवू शकते. मात्र, कोणत्याही त्रासाशिवाय सामान्य व्यक्तींमध्येही हे घडणे पूर्णपणे नैसर्गिक आहे.
शारीरिक संबंधांनंतर रडू येण्यामागची प्रमुख कारणे
-
अति-समाधानाची अपेक्षा: अनेकदा जोडीदाराकडून किंवा स्वतःकडून लैंगिक सुखाच्या अवास्तव अपेक्षा ठेवल्या जातात. त्या पूर्ण न झाल्यामुळे येणारी निराशा रडण्यास कारणीभूत ठरू शकते.
-
संप्रेरकांचा बदल (Hormonal Shift): संबंधांदरम्यान शरीरात ‘डोपामाइन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ सारख्या आनंदी संप्रेरकांचा पूर येतो. संबंध संपल्यानंतर जेव्हा या संप्रेरकांचा स्तर अचानक खाली येतो, तेव्हा शरीराला मानसिक धक्का बसू शकतो आणि उदास वाटू लागते.
-
तीव्र कामोत्तेजना (Intense Orgasm): तीव्र ‘ओर्गॅझम’मुळे शरीरातील संवेदना इतक्या वाढतात की, त्या भावना बाहेर काढण्यासाठी शरीर रडण्याचा किंवा हसण्याचा मार्ग निवडते.
-
ताणतणाव आणि आरोग्य: कामाचा ताण, आर्थिक चिंता किंवा आरोग्याच्या तक्रारी असल्यास शरीर पूर्णपणे रिलॅक्स होऊ शकत नाही, ज्याचे रूपांतर नंतर रडण्यात होते.
-
रजोनिवृत्ती (Menopause): महिलांमध्ये रजोनिवृत्तीच्या काळात होणाऱ्या हार्मोनल बदलांमुळेही पीसीडीची लक्षणे दिसू शकतात.
उदास वाटल्यास काय करावे?
तज्ज्ञांच्या मते, ही भावना तात्पुरती असते. अशा वेळी स्वतःला दोष न देता शांत राहणे महत्त्वाचे आहे. जर असे वारंवार घडत असेल, तर आपल्या जोडीदाराशी किंवा जवळच्या मित्राशी यावर मोकळेपणाने चर्चा करावी. जर ही उदासी नैराश्याकडे (Depression) नेत असेल, तर एखाद्या मानसोपचारतज्ज्ञाचा किंवा लैंगिक समस्या तज्ज्ञाचा (Sexologist) सल्ला घेणे फायदेशीर ठरते.
