Women’s World Cup: भारतीय संघाला पराभवाचा मोठा धक्का!

WhatsApp Group

महिला वर्ल्ड कप स्पर्धेत (Women’s World Cup) वेस्ट इंडिज विरूद्ध मोठा विजय मिळवलेल्या टीम इंडियाने इंग्लंड विरूद्धच्या सामन्यात (India Women vs England Women) मोठी निराशा केली आहे. इंग्लंड विरूद्धच्या महत्त्वाच्या सामन्यामध्ये भारतीय महिला संघ 134 धावांवर ऑल आऊट झाला. मिताली राजच्या (Mithali Raj) टीमला संपूर्ण 50 ओव्हर्स खेळण्यातही अपयश आले. इंग्लंडने टीम इंडियाला फक्त 36.2 ओव्हर्समध्ये ऑल आऊट केले.

विजयासाठी मिळालेल्या 135 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या महिला संघाने 31 व्या षटकात 6 विकेट्स गमावत हे आव्हान पूर्ण केले. या महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील इंग्लंडचा हा पहिलाच विजय ठरला आहे. यापूर्वी झालेल्या तीन्ही सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.

स्मृती मंधाना (Smriti Mandhana) आणि यास्तिका भाटिया (Yastika Bhatia) या जोडीला चांगली सुरूवात करण्यात अपयश आलं. यास्तिका फक्त 8 रनवर आऊट झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या मिताली राजकडून भारतीय टीमला मोठी अपेक्षा होती. मात्र तिलाही अपयश आले. मिताली 5 बॉलमध्ये 1 रन काढून आउट झाली.


सुरूवातीलाच मिळालेल्या या दोन मोठ्या धक्क्यानंतर भारतीय टीम अजूनही सावरलीच नाही. टीम इंडियाच्या इतर खेळाडूंनाही मोठा स्कोअर करण्यात अपयश आले आहे. भारताकडून स्मृती मंधानाना (Smriti Mandhana) हिने सर्वाधिक 35 रन केले. तर रिचा घोषने 33 रनची खेळी केली. या वर्ल्ड कपमध्ये फॉर्मात असलेली हरमनप्रीत कौरला आज मात्र कमाल करता आली नाही. ती फक्त 14 रन काढून आऊट झाली.

रिचा घोष आणि झूलन गोस्वामी या जोडीने आठव्या विकेटसाठी 37 रनच्या केलेल्या भागिदारीमुळे टीम इंडियाला 125 रनचा टप्पा ओलांडता आला. भारतीय टीमने याआधी पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज विरूद्ध विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडकडून पराभव स्विकारावा लागला आहे. इंग्लंड संघाने पहिल्या तीन्ही मॅच गमावल्या आहेत. त्यामुळे वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी इंग्लंडला ही मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकणे आवश्यक होते.