विशेष लेख; गरीब गरीबच राहिला…’या’ मुलांचं भविष्य तरी कसं घडणार?

WhatsApp Group

जन्माला आल्यावर बालपण आपलं आनंदात जातं. बालपण हा जीवनातील सगळ्यात सुंदर आणि निष्पाप काळ असतो. त्या वयात जबाबदाऱ्यांची चिंता नसते, फक्त खेळ, गोड आठवणी आणि घरच्यांचे प्रेम यामध्येच दिवस जातात. आईचा हात पकडून आपण चालायला लागतो. वडील कष्ट करुन घरी पैसै आणतात, घरात जे काही हवं असलेलं सामान आणायचं हे त्यांचं कर्तव्य. तर दुसरीकडे आई जी घर सांभाळते. आपण जसे जसे मोठे होत जातो, तसं तसं आपल्याला सर्वकाही समजू लागतं. आई-वडिलांचे त्याग आणि कष्टाची आपण मोठे झाल्यावरच खरीखुरी जाणीव होते. बालपणातील छोटी छोटी सुखं आणि आई-वडिलांचा हात धरून चालण्याचा क्षण आयुष्यभर आपल्याला उर्जादायी ठरतात.

गरिबीत दिवस

शाळेत बालवाडीत गेल्यावर आपण अ, आ, इ, ई बाराखडी शिकतो. जसे जसे मोठे होत जातो, तसा अभ्यासाचा ताणही वाढतो. नववी- दहावीमध्ये अभ्यासक्रम थोडा कठीणच असतो. ज्यांच्या घरची परिस्थिती चांगली ते मात्र पैसै भरून क्लास लावतात आणि चांगले मार्क घेतात. पण ज्या मुलाची परिस्थिती बेताची घरातील वडील जेव्हा काम करणार तेव्हा दोन वेळचं जेवण ज्यांच्या घरात शिजतं. त्यांना फी भरून क्लास करणं, शक्य नसतं. शिक्षण हा प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क असला तरी परिस्थिती प्रत्येकासाठी सारखी नसते. काहींना शिकण्यासाठी सर्व सुविधा सहज मिळतात, तर काहींना त्यासाठी संघर्ष करावा लागतो. गरीब घरातील मुलं ज्या जिद्दीनं परिस्थितीशी लढा देत शिकतात, ती खरोखर प्रेरणादायी असतात. गरिबीत दिवस काढून मेहनत करून ही मुलं चांगले मार्क घेतात, नंबर काढतात. दहावी झाल्यावर काही महिने सुट्टी असते, या सुट्टीत ही गरीब मुलं मज्जा मस्ती करण्यात न घालवता कुठेतरी काम करतात थोडे का असेना पण तेवढे तरी पैसे कमवतात.

पैसे भरून कोर्स करणं अशक्य

काही महिने झाल्यावर पुन्हा कॉलेज सुरू. अकरावी बारावीपर्यंत ही मुलं शिकतात. त्यांनतर वेळ येते ती कोर्स करण्याची मात्र काही मुलं बीए, बीकॉम, बीएससी करतात. तर काहीजण कोर्स करण्याचा विचार करतात. तसं पाहायला गेलं तर कोर्स करणं हे एका गरीब घरातल्या मुलाला सहसा शक्य होतं नाही. ज्यांच्या घरची परिस्थीत चांगली ते मात्र कोर्स करायला पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन कोर्स करतात. चांगलं शिकतात आणि नोकरीला लागतात त्यांचं चांगलं होतं. श्रीमंत कुटुंबातील मुलांना कोर्सेससाठी मोठ्या शहरांत जाण्याची संधी सहज मिळते, तर गरीब घरातील मुलांना प्रत्येक पायरीवर संघर्ष करावा लागतो. कोर्स करायचे म्हटलं की फी, राहण्याचा खर्च, पुस्तकं आणि इतर गरजा यासाठी पैसे लागतात. अनेक गरीब मुलं शिक्षणासाठी कर्ज घेतात, काही जण पार्ट-टाइम नोकरी करतात, तर काही जण जबाबदाऱ्यांमुळे शिक्षण सोडून थेट नोकरी शोधतात. त्यामुळेच अनेकदा गरीब मुलांना आपल्या इच्छेनुसार शिक्षण घेणं अवघड जातं.

गरीब घरातल्या मुलांचा दिनक्रम

पण तिथेच राहतो, तो मात्र गरीब घराण्यातला मुलगा. गरीब घरातला मुलगा जास्तीत जास्त सांगितल्याप्रमाणे बीए, बीकॉम, बीएससीच करू शकतो, याचं कारण म्हणजे पैसै नसणं. एवढं सगळं असूनही ही मुलं मेहनत करतात. उदाहरण द्यायचं म्हंटलं तर आपल्या सिंधुदुर्गातलीच मुलं पाहा. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, कणकवली येथील जवळ जवळ 50% मुलं गोव्यात कामाला जातात. बसमधून सकाळी 6च्या बसणं जायचं आणि संध्याकाळच्या बसने घरी यायचं म्हणजे 7 वाजून जातात, असा गरीब घरातल्या मुलांचा दिनक्रम. सिंधुदुर्गातील मुलांचं उदाहरण बघितलं तर गोव्यात जाऊन काम करणं हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग झालाय. दिवसाच्या 12-13 तासांची मेहनत, त्यात प्रवासाचा खर्च, आणि तरीही कमी पगार—हे सगळं त्या मुलांसाठी फार कठीण असतं. शिक्षण अपुरं राहिल्यामुळे चांगल्या संधी मिळत नाहीत, आणि त्यामुळेच त्यांना कमी पगाराची नोकरी या मुलांना करावी लागते.

वडापाव खाताना 10 वेळा विचार

मेहनत करून दिवसभर काम केलं तरी हाती उरलेली रक्कम अगदी तुटपुंजीच असते. अशा परिस्थितीत गरीब घरातील मुलांसाठी दोनच पर्याय राहतात—घरखर्च भागवायचा की स्वतःच्या भविष्यासाठी पैसे साठवायचे. त्यांच्यासाठी प्रत्येक खर्च हा विचार करून करावा लागतो, अगदी साधा वडापाव खायचा झाला तरीही. याउलट, ज्यांना घरून आर्थिक पाठबळ असतं, त्यांना या गोष्टींची चिंता नसते. ते मोकळेपणाने फिरू शकतात, हॉटेलमध्ये जाऊ शकतात, नवीन संधी शोधू शकतात. गरीब आणि श्रीमंत यांच्या जीवनशैलीतील हा तफावत पाहिला तर असं वाटतं की मेहनतीनं सगळं मिळतं हे केवळ बोलण्यापुरतंच खरं आहे.

मुलींच्या अपेक्षाही मोठ्या

या गरिबीचा विचार करता करता वय होत ते लग्नाचं. मुलं कष्ट करुन जे काही कमवतात त्यात ते स्वतःही समाधानी नसतात. तसं पाहायला गेलं तर आजच्या काळात मुलींच्या अपेक्षाही मोठ्या. मला 50 हजारवाला, 1 लाख पगारवला मुलगा पाहिजे, मुंबईत फ्लॅट पाहिजे तरच लग्न करणार या आजच्या मुलींच्या अटी. पण गरीब घरातली मुलं तर 15-20 हजार कमवतात त्यांचं काय मग? मुलीच्या घरातील लोकं एवढा पगार मिळविणाऱ्या मुलाशी लग्न करायला नकार देतात हे तर सर्वांनाच माहितीय. गरीब घरातील मुलं आधीच शिक्षण, नोकरी आणि रोजच्या खर्चासाठी झगडत असतात. त्यात लग्नाच्या बाबतीतही त्यांना मोठ्या अपेक्षांचा सामना करावा लागतो. आजच्या काळात मुली करिअरमध्ये पुढे जात आहेत, त्यांना स्थिरता आणि सुरक्षितता हवी असते. पण याचा अर्थ गरीब मुलांना संधीच नाही का? प्रत्येकाला चांगलं आयुष्य हवं असतं, पण सगळ्यांना एकसारख्या संधी मिळत नाहीत. 15-20 हजार कमवणाऱ्या मुलाने काय करावं? तो आपल्या मेहनतीवर, कष्टांवर भर देतो, पण समाज त्याला आर्थिक स्थैर्याच्या निकषावरच मोजतो.

सत्य परिस्थिती

स्वतःची मुलगी मात्र अभ्यासात हूशार नसली तरी मुलीच्या आई वडिलांच्या अपेक्षा काय? तर नवरा 60 हजार,70 हजार रुपये कमावणारा हवा. मुंबईला हे हवं ते हवं… अशावेळी गरीब मुलांन करावं तरी काय? हुशार असून पुढे कोर्स करायला पैसे नाही म्हणून मागेच राहिलेल्या या गरीब मुलांचं भविष्यात काय होणार? याचा कधी कोणी विचार केला का? आज जवळ जवळ कितीतरी मुलं लग्नाशिवाय आहेत. यात पाहायला गेलं तर 30-32 वर्षाची 80% मुलं लग्नाशिवाय आहेत. याचं कारण गरिबीच म्हणावं लागेल. ज्याला घरात आई वडिलांकडूंन पैसै मिळाले त्याचं चांगलं झालं. मात्र, मेहनत करून जे काही 5-10 हजार रुपये कमवतात ही मुलं गरीबच राहिली. समाजात पैसा आणि स्थैर्य याला एवढं महत्त्व दिलं जातं की मेहनतीनं पुढे जाणाऱ्या, कष्ट करणाऱ्या गरीब मुलांकडे कोणी पाहायलाही तयार नसतं. मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी नवऱ्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवणं चुकीचं नाही, पण अशा अपेक्षा ठेवल्या तर गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबातील मुलांचं काय? त्यांचं आयुष्य लग्नाशिवायच जायचं का? नवरा श्रीमंत असण्यापेक्षा तो प्रामाणिक, मेहनती आणि जबाबदारी घेणारा आहे का, हे पाहायला हवं.