अमित शहा यांचा राजकीय प्रवास…
भारताचे गृहमंत्री अमित शहा यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
भाजपचे दिग्गज नेते आणि भारत देशाचे सध्याचे गृहमंत्री अमित शहा यांचा आज (22 ऑक्टोबर ) वाढदिवस. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास…
अमित शहा यांचा शाह यांचा जन्म 22 ऑक्टोबर 1964 रोजी एका व्यावसायिकाच्या घरी झाला. ते अगदी लहान वयातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सामील झाले. 1982 मध्ये, महाविद्यालयीन काळात शहा नरेंद्र मोदींना भेटले होते. 1983 मध्ये अमित शहा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सामील झाले त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली होती.
शहा यांनी 1987 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. 1987 मध्ये त्यांना भारतीय जनता युवा मोर्चाचे सदस्य बनवण्यात आले. 1991 मध्ये शहा यांना पहिली मोठी राजकीय संधी मिळाली, जेव्हा त्यांनी गांधीनगर संसदीय मतदारसंघात अडवाणींच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारली. दुसरी संधी 1996 मध्ये आली, जेव्हा अटलबिहारी वाजपेयींनी गुजरातमधून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. या निवडणुकीतही त्यांनी प्रचाराची जबाबदारी स्वीकारली. व्यवसायाने स्टॉक ब्रोकर असलेल्या अमित शहा यांनी 1997 मध्ये गुजरातमधील सरखेज विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली.
1999 मध्ये त्यांची अहमदाबाद जिल्हा सहकारी बँकेच्या (एडीसीबी) अध्यक्षपदी निवड झाली. 2009 मध्ये ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष झाले. नरेंद्र मोदींनी अध्यक्षपद सोडल्यानंतर 2014 मध्ये ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष झाले. 2003 ते 2010 पर्यंत त्यांनी गुजरात सरकारच्या मंत्रिमंडळात गृह मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळली.
2012 मध्ये नारानूप्रा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवण्यापूर्वी त्यांनी तीन वेळा सरखेज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले. ते गुजरातच्या सरखेज विधानसभा मतदारसंघातून 1997 (पोटनिवडणूक), 1998, 2002 आणि 2007 पासून अनुक्रमे चार वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जवळचे मानले जातात.
अहमदाबाद शहराबाहेरच्या सोहराबुद्दीन शेखच्या बनावट चकमकीप्रकरणी अमित शहा यांना 25 जुलै 2010 रोजी अटक झाली होती. तर ऑक्टोबर 2010 मध्ये अमित शहा यांना गुजरात उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झाला होता. 30 डिसेंबर 2014 ला मुंबईतील विशेष न्यायालयाकडून अमित शहा यांना आरोपमुक्त करण्यात आले होते.
सोळाव्या लोकसभा निवडणुकीच्या सुमारे 10 महिने आधी, शहा यांना 12 जून 2013 रोजी भारतीय जनता पक्षाच्या उत्तर प्रदेशचे प्रभारी बनवण्यात आले, तेव्हा उत्तर प्रदेशमध्ये भाजपकडे फक्त 10 लोकसभेच्या जागा होत्या. 16 मे 2014 रोजी 16 व्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावर त्यांचे संघटन कौशल्य आणि नेतृत्व क्षमता स्पष्ट झाली. उत्तर प्रदेशात भाजपने 71 जागा जिंकल्या होत्या. हा भाजपचा राज्यातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय होता. या करिश्माई विजयाने अमित शहा यांचे पक्षात महत्व इतके वाढले की त्यांना भारतीय जनता पक्षाचे अध्यक्षपद देण्यात आले.
मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात भारताचे गृहमंत्री बनल्यानंतर अमित शहा यांनी जम्मू -काश्मीरमधून कलम 370 हटवण्याचा मोठा निर्णय घेतला होता.