मुंबई – 6/11 च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबला पकडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांना त्यांनी केलेल्या शौर्याबद्दल महाराष्ट्र सरकारकडून बक्षीस देण्यात येणार आहे. अजमल कसाबला मोठ्या धाडसाने पकडणाऱ्या सर्व पोलीस कर्मचाऱ्यांच्या वेतनामध्ये वाढ करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने 2020 मध्ये घेतला होता. या निर्णयाची आता अंमलबजावणी होणार आहे.
26 नोव्हेंबर 2008 रोजी अजमल कसाबसह इतर नऊ दहशतवाद्यांकडून मुंबईवर हल्ला करण्यात आला होता. यात आठ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. तर अजमल कसाबलला पोलिसांनी आपल्या जीवाची बाजी लावून जिवंत पकडले होतं. या घटनेनंतर आता तब्बल 12 वर्षांनी 2020 साली कसाबला पकडणाऱ्या पोलिसांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या सर्व टीमला वन स्टेप प्रमोशन वेतन देण्याचा निर्णय जाहीर केला होता.
वन स्टेप प्रमोशन वेतन म्हणजे हे पोलीस ज्या पदावर आहेत त्यांना त्यांच्या वरील पदावर असणाऱ्या अधिकाऱ्यांना जेवढा पगार असणार तेवढा पगार त्यांना मिळणार आहे. राज्य सरकारकडून 15 जणांना हे बक्षीस देण्यात येणार आहे. यामध्ये कॉन्स्टेबल आणि पोलीस अधिकारी दर्जाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे आदेश नुकतेच जारी करण्यात आले आहेत.
मुंबई पोलीसमधील एका अधिकाऱ्याने सांगितले की, 15 पोलिसांना बक्षीस देण्याचे आदेश गृहमंत्रालयाकडून जारी करण्यात आले आहेत. या आदेशानुसार, कसाबला पकडणाऱ्या अधिकाऱ्यांना पगारामध्ये वाढ करण्यात येणार आहे. लवकरच या आदेशाची अंमलबजावणी होणार आहे.