बीड – बीडमध्ये नवरदेवाला हवेत गोळीबार करणं चांगलंच महागात पडलं आहे. या संबंधित घटनेचा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला होता. त्यानंतर आता नवरदेवासोबत त्याच्या मित्रालाही पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाईतील केज रस्त्यावर असलेल्या एका मंगल कार्यालयामध्ये बालाची भास्कर चाटे (साकूड, ता. अंबाजोगाई) या तरुणाचा हळदी समारंभाचा कार्यक्रम होता.
या लग्नाला शेकडो लोकांनी हजेरी लावली होती. आनंदात आणि थाटामाटात हा कार्यक्रम पार पडला होता. पण हळदी समारंभ पार पडल्यानंतर रात्री साडेदहाच्या सुमारास बालाजीने आपल्या मित्रांसोबत बेधुंद होऊन डान्स केला मात्र यावेळी बालाजीने हातात बंदूक घेत हवेत फायरींग केली होती.
अंबाजोगाई शहराजवळील सायली लॉन्स या मंगल कार्यालयामध्ये 26 मार्चला हळदीच्या कार्यक्रमाला नवरदेवासह त्याच्या मित्राने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली होती. बालाजी भास्कर चाटे असे अटक केलेल्या नवरदेवाचे तर बाबा शेख असे त्याच्या मित्राचे नाव आहे. हे दोघे साकुड येथील शेतामध्ये लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मोठ्या शिताफीने दोघांना रात्री ताब्यात घेतले आहे.