पंजाबमधील भाजपची प्रचारसभा फ्लॉप ठरली होती. नियोजित सभेत गर्दी न जमल्यानं पंतप्रधानांनी दिल्ली परतण्याचा निर्णय घेतला’ असा आरोप पंजाब कॅबिनेटमधील मंत्री राजकुमार विर्का यांनी केला आहे. सभास्थळावरील रिकाम्या खुर्च्यांचा व्हिडिओही सध्या बराच व्हायरल होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पंजाबच्या फिरोजपूर दौऱ्यादरम्यान झालेल्या सुरक्षेमधील चुकीवरुन सध्या राजकीय घमासान सुरु आहे. भारत-पाक सीमेवरील हुसैनीवाला येथील शहीद स्मारकाला भेट देण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधानांच्या ताफ्याला आंदोलक शेतकऱ्यांनी फ्लायओव्हरवर अडवलं. स्मारकापासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर हा ताफा १५ ते २० मिनिटं रोखून धरण्यात आला. त्यानंतर हा दौराच रद्द करुन पंतप्रधान भटिंडा विमानतळावर परतले आणि दिल्लीला रवाना झाले. ‘मी भटिंडा विमानतळावर जिवंत पोहोचू शकलो, त्याबद्दल तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा’ असा निरोप त्यांनी विमानतळावरील अधिकाऱ्यांना दिला.
दरम्यान, पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेलं नियमांचं उल्लंघन आणि निष्काळजीपणाबद्दल जबाबदारी निश्चित करण्याचे निर्देश पंजाब सरकारला केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत. या घटनेबाबत पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी खेद व्यक्त करतानाच पंतप्रधानांच्या सुरक्षेत कुठलाही ढिसाळपणा झाला नसल्याचं म्हटलं आहे. दौऱ्याचा मार्ग अचानक बदलल्यानंच हा गोंधळ झाल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
देशातल्याच एका राज्यात प्रवास करताना पंतप्रधानांना असुरक्षित वाटावं, यापेक्षा वाईट ते दुसरं काय…पण या घटनेनं १९६७ साली घडलेल्या एका घटनेला नव्यानं उजाळा दिला. १९६६ साली तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या निधनानंतर पंतप्रधान बनलेल्या इंदिरा गांधींच्या नेतृत्वात काँग्रेस निवडणूक प्रचारात उतरली होती. ‘गुंगी गुडिया’ असं म्हणत त्याकाळी संसदेत इंदिरा गांधींचा उपहास केला जायचा. त्यांच्या नेतृत्व गुणांबद्दल अनेकांच्या मनात शंका, अविश्वास होता. अशात १९६७ साली ओडिशाच्या भुवनेश्वरमधील प्रचार सभेला त्या संबोधित करीत होत्या. या सभेदरम्यान काही विद्रोही घटकांनी इंदिरा गांधींना विट फेकून मारली. ती सरळ त्यांच्या नाकावर बसली आणि भळाभळा रक्त वाहू लागलं. गांधींच्या सुरक्षा रक्षकांनी, काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांना मंच सोडण्याची विनंती केली. मात्र, वेदनेची पर्वा न करता रक्त रुमालाने रोखून त्या भाषण देतच राहिल्या. या घटनेनंतर कोलकात्याचा नियोजित दौरा रद्द करुन दिल्लीला परतण्याची त्यांना विनवणी करण्यात आली. मात्र, ठाम भूमिका घेत त्यांनी नाकावर पट्टी बांधून हा दौरा पूर्ण केला. या हल्लात इंदिरा गांधींच्या नाकाचं हाड तुटल्यानं नंतर त्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. विशेष म्हणजे ही घटना घडण्यापूर्वी सुंदर दिसण्यासाठी इंदिरा गांधींनी नाकाची सर्जरी केली अशी त्याकाळी अफवा होती. इंदिरा गांधींना आर्यन लेडी का म्हटलं जातं, ही घटना त्यांचं बोलकं उदाहरण आहे.
पंतप्रधान पदाच्या गौरवाला धक्का पोहोचेल, अशा कुठल्याही वर्तनाचा निषेधच. मात्र, पंजाबमधील घटनेनं शेतकऱ्यांचा पंतप्रधानांवरील रोष अजुनही कायम असल्याचं प्रकर्षानं पुढे आलं आहे. कारण एक, दोन नव्हे तर तब्बल ३७८ दिवसांच्या निकराच्या लढ्यानंतर केंद्र सरकारनं ३ कृषी कायदे मागे घेतले. याकाळात ७०० पेक्षा जास्त आंदोलक शेतकऱ्यांनी प्राण गमावले. सीमांवर खिळे ठोकून विविध क्रृर पद्धतीनं हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्नही झाला. निवडणुकांची वाट न पाहता शेतकऱ्यांची ही वेदना मोदींनी वेळीच समजून घेतली असती, तर कदाचित दौरा रद्द करण्याची नामुष्की पंतप्रधानांवर ओढवली नसती.