पंतप्रधान मोदी, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे उद्या एकाच मंचावर?

WhatsApp Group

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून आक्रमक हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणाऱ्या मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यामुळे शिवसेना अडचणीत आली आहे. हिंदुत्वाचा मुद्दा आपण सोडला नसल्याचे शिवसेनेकडून वारंवार सांगण्यात येत आहे.

मशिदींच्या भोंग्यांवरून आक्रमक झालेले राज ठाकरे भाजपचा भोंगा असल्याची टीका शिवसेनेकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज ठाकरे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील हजर असतील.

मास्टर दिनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून दिल्या जाणाऱ्या पुरस्कारांचे वितरण उद्या होणार आहे. मुंबईमधील षण्मुखानंद हॉलमध्ये सोहळा संपन्न होईल. लता मंगेशकर यांच्या नावाने प्रथमच पुरस्कार दिला जाणार आहे. हा पहिलावहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी मोदी उद्या मुंबईमध्ये येणार आहेत.

उद्याच्या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना निमंत्रित करण्यात आलं आहे. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनादेखील आमंत्रण देण्यात आलं आहे. हे दोन्ही उद्याच्या सोहळ्याला उपस्थित राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ठाकरे बंधू एकाच मंचावर दिसतील.