पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (1 ऑगस्ट) रोजी महाराष्ट्रातील पुणे दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान सकाळी 11 वाजता दगडूशेठ गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेऊन पूजाअर्चा करणार आहेत. सकाळी 11.45 वाजता पंतप्रधानांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर, दुपारी 12:45 वाजता पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवणार आहेत तसेच विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करणार आहेत.
पंतप्रधान मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या कार्य पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण करणार आहेत. हे विभाग फुगेवाडी स्थानक ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय स्थानक ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्ये पंतप्रधानांच्याच हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांसारखी महत्त्वाची ठिकाणे जोडतील. देशभरातील नागरिकांना आधुनिक आणि पर्यावरणस्नेही गतिमान शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या दृष्टीकोनाला साकार करण्याच्या दिशेने हे लोकार्पण एक महत्त्वाचे पाऊल आहे.
Prime Minister Narendra Modi to visit Pune on 1st August. PM will perform darshan and pooja at Dagdusheth Mandir. Later, he will be conferred Lokmanya Tilak National Award. Thereafter, PM will flag off metro trains and inaugurate and lay the foundation stone of various… pic.twitter.com/XCdWECMTVw
— ANI (@ANI) July 30, 2023
छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत मेट्रो रेल्वे मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडी सारखी म्हणजेच ज्याला “मावळा पगडी” देखील म्हटले जाते, या सारखी आहे. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते.
आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाणी न्यायालय मेट्रो स्थानक. हे देशातील सर्वात खोलवर असलेल्या मेट्रो स्थानकांपैकी पैकी एक आहे, ज्याचा सर्वात खोल बिंदू 33.1 मीटर आहे. सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत बनवण्यात आले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका (पीसीएमसी) अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाईल.
सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात येणार आहेत. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित करणार आहेत. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.
पंतप्रधानांना लोकमान्य टिळक पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. लोकमान्य टिळकांच्या परंपरेचा सन्मान म्हणून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचा आरंभ टिळक स्मारक संस्थेने 1983 मध्ये केला. देशाची प्रगती आणि विकास यासाठी कार्य केलेल्या तसेच त्या बाबतीत उल्लेखनीय आणि विशेष योगदान देणाऱ्या व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. लोकमान्य टिळकांची पुण्यतिथी म्हणजे 1 ऑगस्टला दरवर्षी हा पुरस्कार प्रदान केला जातो.
पंतप्रधान या पुरस्काराचे 41 वे मानकरी असतील. हा पुरस्कार मिळालेल्या दिगजांमध्ये डॉक्टर शंकर दयाळ शर्मा, प्रणव मुखर्जी, अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मनमोहन सिंग, एन आर नारायण मूर्ती, डॉ. ई. श्रीधरन या व्यक्तींचा समावेश आहे.