धावपट्टीवर उडणारे विमान ट्रकला धडकले; दोघांचा मृत्यू, थरारक व्हिडिओ आला समोर

WhatsApp Group

पेरूमध्ये शुक्रवारी मोठी दुर्घटना घडली. येथील लिमा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीवर एका विमानाची आग लागलेल्या ट्रकला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रकचा चक्काचूर झाला आणि विमानाचेही नुकसान झाले. या अपघातात ट्रकमधील दोन अग्निशमन जवानांचा मृत्यू झाला. सुदैवाने, विमानातील सर्व 102 प्रवासी आणि क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत. या धोकादायक घटनेचा एक भयानक व्हिडिओही समोर आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, LATAM एअरलाइन्सचे एक प्रवासी विमान लिमा विमानतळावर टेक-ऑफसाठी धावपट्टीवर होते. विमान टेक ऑफ करणार असतानाच विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकले. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, विमानतळावरील उड्डाणे सध्या थांबवण्यात आली आहेत आणि एअरबस A320neo चे सर्व प्रवासी आणि क्रू यांची काळजी घेतली जात आहे.

ट्रकला धडकल्यानंतर LATAM एअरलाइन्सच्या विमानाला आग लागल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. मात्र, प्रवासी पूर्णपणे सुरक्षित आहेत. दुसरीकडे, अग्निशमन विभागाचे जनरल कमांडर लुईस पोन्स यांनी सांगितले की, अग्निशमन दलाच्या दोन जवानांचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण जखमी झाला आहे. अपघाताच्या वेळी विमान आणि ट्रक दोन्ही वेगात होते.

पेरूचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो कॅस्टिलो यांनी अग्निशमन दलाच्या दोन जवानांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. आपल्या एका ट्विटमध्ये त्यांनी मृतांच्या कुटुंबियांप्रती शोक व्यक्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लीमा विमानतळावरून हे विमान ज्युलियाका शहराच्या दिशेने जात होते.