इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी सौदी अरेबियाच्या जेद्दाह शहरात 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडलं. या ऑक्शनमधून तरुण खेळाडूंना संधी मिळाली असून आयपीएल संघांनी लावलेल्या बोलीमुळे अनेकांवर पैशांचा पाऊस पडला आहे. वैभव सूर्यवंशी या 13 वर्षांच्या युवा क्रिकेटरने आयपीएल ऑक्शनसाठी नाव नोंदवलं होतं. त्यामुळे आयपीएल ऑक्शनच्या इतिहासातील हा सर्वात युवा खेळाडू ठरला. वैभव सूर्यवंशी ऑक्शन टेबलवर येताच त्याच्यासाठी आयपीएल (IPL 2025) संघांनी करोडो रुपयांची बोली लावली.
मेगा ऑक्शनमध्ये वैभव सूर्यवंशी हा सर्वात तरुण खेळाडू ठरला. त्याचे वय 13 वर्षे असून त्याचा जन्म 27 मार्च 2011 रोजी झाला. वैभव सूर्यवंशी या ऑल राउंडर खेळाडूने बिहारसाठी पाच प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. सप्टेंबर 2024 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन चार दिवसीय रेड-बॉल क्रिकेट सामने खेळणाऱ्या भारताच्या अंडर-19 संघाचा वैभव देखील भाग होता. यावेळी त्याने शानदार शतक झळकावून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. वैभवने आतपर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 5 सामने खेळून 100 धावा केल्या असून गोलंदाजी करताना 1 विकेट सुद्धा मिळवली आहे.