पिंडाला कावळा कसा शिवतो? पुढील जन्माच्या प्राण्याची आकृती पिठावर कशी येते?

WhatsApp Group

पूर्ण समाधानी जीवन जगून कसलीही अतृप्त इच्छा मागे न ठेवता जर व्यक्ती मेली, तर तिच्या पिंडाला कावळा पटकन शिवतो. अपुरी इच्छा अगर वासना मागे ठेवून एखादी व्यक्ती मेली, तर कावळा शिवत नाही. ती इच्छा पुरी करण्याचे वाचन नातेवाईकाने दिले, कावळा पिंडाला शिवतो अशी अंधश्रद्धा आहे.

प्रामाणिकपणे विचार केल्यास मरणारी प्रत्येक व्यक्ती एक किंवा अनेक इच्छा मागे ठेवूनच मरते. शेवटपर्यंत कोणीही समाधानी नसते. म्हातारपणात आपल्याला कामलीला करता येणे अशक्य वाटल्याने ययाती आपल्या मुलाचे तारुण्य मागून घेतो. हा ययाती माणसाच्या वासनांचा प्रतिनिधी आहे. मी आता सुखाने मरतो, राजे सुखरूप गडावर पोहोचले असे म्हणत मरणारा बाजीप्रभू हजारोंत एखादा. याचा अर्थ असा, की एखादा अपवाद सोडला तर प्रत्येक मृत व्यक्तीच्या बाबतीत पिंडाला कावळा शिवता कामा नये. पण प्रत्यक्ष निरीक्षणात असे दिसत नाही. बऱ्याच व्यक्तींच्या बाबतीत पिंडाला कावळा पटकन शिवतो.

मी या संदर्भात २० मृत व्यक्तीच्या पिंड घटनांचे निरीक्षण केले आहे. त्यात ऐन तारुण्यात अपघातात ठार झालेल्या व्यक्ती, लहान मुले पाठीमागे ठेवून आजारामुळे मरण पावलेल्या व्यक्ती, मुलीचा विवाह ठरवायचा प्रयत्न चालला असताना वारलेले वडील इत्यादी प्रकारच्या व्यक्ती होत्या. जवळ जवळ या सर्वच केसेस बाबतीत पिंडाला कावळा पटकन शिवल्याचे माझे निरीक्षण आहे. यावरून सूज्ञांनी योग्य तो निष्कर्ष काढावा.मग काही वेळा कावळा पिंडाल लगेच शिवणे, तर काही वेळा उशिराने शिवणे असे का घडते? याचा मृतात्म्याच्या इच्छेशी काहीही संबंध नाही. कावळ्यासारख्या घाणेरड्या पक्ष्याच्या रूपाने आपल्याला प्रिय व्यक्तिचा… ही कल्पना हास्यास्पद आहे.

कावळा हा इतर पक्ष्यांपेक्षा धीट पक्षी आहे. तो सर्वत्र आढळतो. स्मशानभूमीच्या आसपास सरावलेले कावळे असतील, तर पिंडाजवळची माणसे आपल्याला हुसकीत नाहीत हे त्यांच्या अनुभवाने लक्षात आलेले असते. त्यामुळे ते लगेच पिंडाला शिवतात. शहरातील स्मशानभूमीत हा अनुभव येतो. शहराच्याजवळ इतर खाद्य पदार्थांची कमतरता असल्याने अशा ठिकाणच्या परिसरातील कावळे अधिक भुकेले असण्याचा संभव जास्त. त्यामुळे पिंडाला पटकन शिवणे घडते. खेड्यात कावळ्यांना ज्वारीची कणसे, मक्याची कणसे इत्यादी पदार्थ खायला मिळतात. असे कावळे भुकेले नसतील तर ते पिंडाला शिवण्याची घाई कशाला करतील? आणि मरणाच्या घटना खेड्यात तुलनेने कमी असल्याने स्मशानभूमीत तळ ठोकण्याचे कावळ्यांना कारण काय? सराईत नसलेले कावळे पिंडाजवळ येतात. त्यांना जीवाची भिती असतेच. जवळ बसलेल्या माणसांना भिऊन ते लगेच दूर उडून जातात. ही माणसे लांब जाऊन बसली, की मग ते धोका नाही हे ओळखून पिंडाला शिवतात. पिंडाला कावळा शिवणे हा प्रकार मुस्लिम, ख्रिश्चन धर्मीयांत नाही. या धर्मांतील सर्व व्यक्ती मरतेवेळी समाधानी असतात काय?

मरतेवेळी पिंडावर पुढील जन्माच्या प्राण्याची आकृती अमाटते, हे खरे नाही. पिठावरून मुंगळा अगर इतर कीटक सरपटल्याने ज्या रेघा उमटतात त्यांना प्राणी समजण्याचा आपला भ्रम असतो. पीठ सारवलेल्या सुपात ठेवले असेल तर सारवलेले सूप वाळताना पोपडे सुटतात. त्यामुळे पिठाच्या पृष्ठभागावर उंचवटे अगर खळगे तयार होतात. त्यातून प्राण्याची आकृती कल्पिली जाते.

  • डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डेयांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार