मुंबई: बदलती जीवनशैली आणि वाढता मानसिक तणाव यामुळे अनेक जोडप्यांमध्ये शारीरिक संबंधांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसते. अनेकजण याकडे केवळ एक नैसर्गिक बदल म्हणून पाहतात, परंतु वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ लैंगिक संबंध न ठेवल्यास शरीरात अनेक नकारात्मक बदल घडून येतात. याचा परिणाम केवळ प्रजनन क्षमतेवरच नाही, तर हृदयाच्या आरोग्यापासून ते रोगप्रतिकारक शक्तीपर्यंत होतो.
रोगप्रतिकारक शक्तीवर होतो विपरित परिणाम
नियमित लैंगिक संबंधांमुळे शरीरात ‘इम्युनोग्लोबुलिन ए’ (IgA) नावाच्या अँटीबॉडीची पातळी वाढते, जी आपल्याला सर्दी, खोकला आणि इतर संसर्गांपासून वाचवते. जेव्हा एखादी व्यक्ती दीर्घकाळ सेक्सपासून दूर राहते, तेव्हा त्याची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होण्याची शक्यता असते. यामुळे वातावरणातील बदलांचा शरीरावर लवकर परिणाम होतो आणि आजारी पडण्याचे प्रमाण वाढू शकते.
मानसिक ताण आणि चिडचिडेपणात वाढ
लैंगिक संबंधांदरम्यान शरीरात ‘एंडोर्फिन’ आणि ‘ऑक्सिटोसिन’ सारखी आनंदी संप्रेरके (Happy Hormones) तयार होतात. ही संप्रेरके नैसर्गिकरित्या तणाव कमी करण्यास मदत करतात. जेव्हा हे चक्र थांबते, तेव्हा व्यक्तीमध्ये चिडचिडेपणा, नैराश्य आणि अस्वस्थता वाढू शकते. पुरेशी झोप न लागणे हे देखील याचे एक मुख्य लक्षण मानले जाते, कारण शरीर तणावमुक्त होण्यासाठी ज्या नैसर्गिक प्रक्रियेवर अवलंबून असते, ती खंडित होते.
हृदयाच्या आरोग्यासाठी ठरू शकते धोकादायक
शारीरिक संबंध हे एक प्रकारचे ‘कार्डिओ वर्कआउट’ मानले जाते. यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि रक्तभिसरण सुधारते. संशोधनानुसार, जे लोक नियमित शारीरिक संबंध ठेवतात, त्यांच्यात हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी असतो. याउलट, दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्याने रक्तवाहिन्यांच्या लवचिकतेवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे रक्तदाब वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
पुरुषांमधील प्रोस्टेट आणि स्त्रियांमधील स्नायूंच्या समस्या
पुरुषांच्या बाबतीत, नियमित विर्या बाहेर न पडल्यामुळे प्रोस्टेट कर्करोगाचा धोका काही प्रमाणात वाढू शकतो, असे काही अभ्यास सांगतात. तर महिलांमध्ये, दीर्घकाळ शारीरिक संबंधांचा अभाव असल्यास योनीमार्गातील स्नायू कडक होऊ शकतात किंवा रक्ताभिसरण कमी झाल्यामुळे नैसर्गिक ओलावा कमी होऊ शकतो. वाढत्या वयात ही समस्या अधिक तीव्र जाणवू शकते.
