पॅट कमिन्स आणि कर्णधारपदाचे ‘ऐतिहासिक’ आव्हान
ग्रॅम स्मिथ, रिकी पॉन्टिंग, क्लाइव्ह लॉईड, स्टीव्ह वॉ. ह्या महान खेळाडूंमधील साम्य काय? सहज उत्तर येईल कि हे सर्व अतिशय यशस्वी कर्णधार होते. मात्र अजून विचार केला कि एक अतिशय साधी वाटणारी पण महत्वाची गोष्ट लक्षात येईल, की हे सर्व प्रामुख्याने फलंदाजी करायचे. क्रिकेटच्या अनेक अलिखित नियमांपैकी एक म्हणजे कि संघातल्या सर्वोत्तम फलंदाजाला संघाचा कप्तान बनवायचे. विराट कोहली, केन विल्यमसन आणि जो रूट हि उदाहरणे लगेच लक्षात येतील. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियाने आता ह्या परंपरेला छेद दिलाय.
ऑस्ट्रेलियन कसोटी कर्णधार टीम पेन हा मैदानाबाहेरील वादात अडकला आणि त्याला पायउतार व्हावे लागले. ह्या परिस्थितीत ऍशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियन निवडसमितीने विश्वास ठेवला तो २८-वर्षीय वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सवर. ह्याच निमित्ताने क्रिकेटमधील एक दुर्लक्षिलेला मुद्दा पुढे आला तो म्हणजे वेगवान गोलंदाजांनी कर्णधार बनू की नये.
क्रिकेटच्या इतिहासाचं मत ह्या विरोधात आहे. अगदी मोजके असे तेज गोलंदाज आहेत ज्यांनी संघाच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळली. हिथ स्ट्रीक, वकार युनिस, वसीम अक्रम, कोर्टनी वॉल्श, बॉब विलीस आणि फाझल महमूद ही प्रमुख काही नावे. ह्या यादीत इम्रान खान, कपिल देव, शॉन पोलॉक आणि जेसन होल्डर सारखी नावे सुद्धा जोडता येतील मात्र यांची फलंदाजी सुद्धा लक्षणीय होती.
माजी इंग्लंड कर्णधार माईक ब्रेअर्ली हा क्रिकेटमधील सर्वात हुशार कर्णधार गणला जातो. त्याने त्याच्या “आर्ट ऑफ कॅप्टनसी” ह्या पुस्तकात तर चक्क लिहिले आहे कि वेगवान गोलंदाजाला अगदी निरुपाय असल्याशिवाय कर्णधार बनवू नये. अस का? तर तो म्हणतो कि अशा वेळी कर्णधाराला आपण किती षटके टाकावी ते कळत नाही. एक तर ते स्वतः जास्त गोलंदाजी करतात किंवा फार कमी. तसेच स्वतःला आराम हवा असताना सुद्धा इतर १० खेळाडूंकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे. एखादा फलंदाज कर्णधार असला तर या अडचणी येत नाहीत.
अर्थात आताच्या काळात क्रिकेट इतक जास्त खेळलं जाते कि खेळाडूंना आलटून पालटून खेळवावे लागते. सर्वात जास्त आरामाची गरज असते ती वेगवान गोलंदाजांना. अशा वेळी पुन्हा संघाचा कर्णधार बदलणार. संघातील खेळाडूंशी असलेलं गणित बदलणार. ह्या आणि अश्या अनेक आव्हानांचा सामना करण्यास पॅट कमिन्स सज्ज आहे. कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात त्याने इंग्लंडचे ५ बळी घेत धमाकेदार सुरुवात केली आहे. कामगिरीत सातत्य ठेवून संघाची जबाबदारी सांभाळण्यात कमिन्स किती यशस्वी ठरेल हे येणार काळच ठरवेल.