सोलापूर – पारधी समाजातील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहत आणण्यासाठी परमेश्वर काळे नावाचे युवक विधायक कार्य करत आहेत. आपल्याच समाजातील दुर्लक्षित पीडित बालकांना शिक्षणाचा धडा देण्याचा वसा घेतलेल्या परमेश्वर यांनी दहा वर्षांपूर्वी संस्कार संजीवन फाऊंडेशन सुरू केले. या फाऊंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सोलापूरातील मुळेगाव रोडवर आश्रम शाळा उभी केली. हीच आश्रमशाळा आज दशकपूर्तीकडे वाटचाल करत असून त्यावर टाकलेला एक प्रकाश.
परमेश्वर काळे हे पारधी समाजातील उच्च शिक्षित तरुण असून मुलांनी शिक्षण घ्यावे हीच त्यांची तळमळ. आपल्या वाटेला जे आलं ते इतरांच्या वाटेला येऊ नये यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक समाजाच्या हितासाठी झटण्याचा निर्धार केला. परमेश्वर काळे यांचे बालपण अगदी खडतर गेले. बालपणापासून ते आगीतून चालत आले आहेत. ते दीड वर्षांचा असताना वडिलांनी आईला टाकलं त्यानंतर सावत्र पित्याच्या गुन्हेगारी कारभारामुळं आईनं आत्महत्या केली.
पुढे काही दिवस शिकार करून त्यांच्या आजी-आजोबांनी त्यांचा सांभाळ केला. नंतर तुळजापूर येथील यमगरवाडी ज्ञानाचे धडे गिरवले. येथे शिकत असताना त्यांनी आपल्या समाजाविषयी काहीतरी करायचे ही खूणगाठ मनाशी बांधली. पुढे पुण्यात अकरावी बारावीचे शिक्षण विद्यार्थी सहायक समिती येथे कमवा शिका योजनेतून पूर्ण केले. डीएडचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांना कायमस्वरूपी शिक्षकाची नोकरीही मिळाली. नोकरी करत असताना समाजावरच्या होणाऱ्या अन्यायाचे चित्र त्यांच्या डोळ्यांपुढे तरळत होते. समाजाचा विकास व्हावा, समाज मुख्य प्रवाहात यावे. यासाठी त्यांनी शिक्षकाच्या नोकरीवर पाणी सोडले.
परमेश्वर पुढे गावोगावी पाला वरती फिरून पारधी समाजातल्या कुटुंबात शिक्षणाचे महत्त्व देऊ लागले. शाळाबाह्य मुलांना एकत्र करू लागले. हे काम करत असताना त्यांना बऱ्याच अडचणी आल्या त्यावर त्यांनी मात करत पुढे मार्ग काढला. त्यानंतर सोलापुरातील मुळेगाव रोड येथे निवासी आश्रमशाळा सुरू केली. आज याच आश्रमशाळेत ३७ मुले इतर मुलांप्रमाणे शिक्षणाचा कित्ता गिरवत आहेत.
कुठल्याही शासकीय अनुदानाविना या मुलांच्या शिक्षण आणि संगोपनाची जबाबदारी त्यांनी सामाजिक संस्थेच्या मदतीने स्वतःच्या खांद्यावर घेतली. आज रोज या आश्रम शाळेत सकाळी प्रार्थना,प्राणायाम,व्यायाम, समाज प्रबोधनात्मक उपक्रम घेतले जातात. गावकुसाबाहेर हिंडणारी मुले शिक्षणातून संस्कारीत होताहेत. काळेच्या रूपाने परमेश्वर पारधी समाजातल्या मुलांमध्ये कुठलाही गाजावाजा न करता प्रसिद्धीपासून दूर राहात ज्ञानाचा प्रकाश टाकताहेत.
या आश्रमशाळेमध्ये प्राथमिक व माध्यमिक वयोगटातील विद्यार्थी वास्तव्याला आहेत. विद्यार्थ्यांना शाळेचे गणवेश, चप्पल, शालेय साहित्य, धान्य, जेवण अशा प्रकारे मदत करता येईल. ही आश्रमशाळा सध्या भाडेतत्त्वावर च्या जागेवर असून जागेचा प्रश्न आजही कायम आहे. सामाजिक संस्थांनी पुढाकार घेतल्यास या आश्रमशाळेतील मुलांना कायमचा निवारा होईल.
पारधी समाजातील मुले शिक्षणाच्या प्रवाहत यावेत यासाठी मी गेल्या दहा वर्षांपासून ही आश्रमशाळा कोणत्याही शासकीय अनुदानाविना चालवत आहे. सामाजिक संस्थांची मदत नेहमी होत असते. भाडेतत्त्वावरच्या जमिनीवर सुरू असलेल्या आश्रम शाळेसाठी जागेची गरज आहे त्यासाठी सामाजिक संस्थांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.