
मुंबई : राज्यात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारादरम्यान मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने आपल्याकडे पुरेशी योग्यता नसावी, असे मत भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी गुरुवारी व्यक्त केले. महाराष्ट्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा एक भाग म्हणून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटातील नऊ मंत्र्यांनी आणि त्यांच्या भाजप मित्रपक्षांच्या नऊ नेत्यांनी गेल्या आठवड्यात शपथ घेतली.
या मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिलेला स्थान न दिल्याने शिंदे यांच्यावर टीका होत आहे. याविषयी विचारले असता पंकजा यांनी पत्रकारांना सांगितले की, कदाचित माझ्याकडे तेवढी पात्रता नसेल. यावर माझी कोणतीही भूमिका नाही. माझा सन्मान जपत मी राजकारण करण्याचा करत आहे. वरिष्ठ नेत्यांनी मला मंत्रिमंडळासाठी लायक मानले नाही. त्यांना पाहिजे तेव्हा ते देतील. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर त्यांचे समर्थक आक्रमक होऊ शकतात आणि राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापू शकते. तसेच त्यांच्या मंत्रिमंडळातील समावेशाबाबत अधिक काही बोलायचे नाही, असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.
शिंदे मंत्रिमंडळात एकही महिला नसल्याने महिला कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. दुसरीकडे पंकजा मुंडे या भाजपच्या अशा नेत्या होत्या ज्यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी चर्चा होती, मात्र तसे झाले नाही. मुंडे यांच्या वक्तव्यानंतर त्यांच्या समर्थकांची नाराजी वाढली आहे. त्याचवेळी पंकजा मुंडे यांनी सरकार विस्ताराबाबत दोन दिवस मौन बाळगले होते, मात्र रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात एकाही महिलेला स्थान न दिल्याने सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला. त्या म्हणाल्या, एकाही महिलेला मंत्रिमंडळात स्थान मिळाले नाही हे दुर्दैव आहे. देशाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के महिला आहेत आणि मंत्रिमंडळात एकही महिला न मिळणे आश्चर्यकारक आहे. यावरून ते महिलांचा आदर करत नसल्याचे दिसून येते.