भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण संबंधांमुळे दोन्ही देशांतील नागरिकांमध्ये एकमेकांच्या देशात जाण्याबाबत मोठी धास्ती असते. असाच काहीसा अनुभव लंडनहून नेपाळला जाणाऱ्या वानजिपा या पाकिस्तानी महिलेला आला, जेव्हा तिचे विमान मुंबई विमानतळावर १० तासांच्या ‘लेओव्हर’साठी (थांबा) उतरले. वानजिपाने सोशल मीडियावर शेअर केलेला तिचा हा अनुभव सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे.
इंडिगोच्या विमानातून मुंबईत आगमन
वानजिपा थेट पाकिस्तानमधून आली नव्हती, तर ती लंडनहून नेपाळला जात होती. तिचे विमान ‘इंडिगो’चे होते आणि मुंबईत १० तासांचा थांबा होता. एक पाकिस्तानी नागरिक म्हणून भारतात उतरताना ती प्रचंड घाबरलेली होती. “भारतात उतरण्यापूर्वी मी खूप नर्वस होते, पण मी स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केले होते,” असे तिने आपल्या पोस्टमध्ये नमूद केले. तिने महिनाभर आधीच इंडिगोशी संपर्क साधून विमानतळाबाहेर न पडता ‘ट्रान्झिट’ करणे शक्य आहे का, याची खात्री करून घेतली होती.
जेव्हा सुरक्षारक्षकांचा फोन आला…
विमानतळावर उतरल्यानंतर इमिग्रेशनची गरज नसल्याने तिची सुरक्षा तपासणी सुरळीत पार पडली. व्हिसा नसल्यामुळे तिला विमानतळाबाहेर जाता येणार नव्हते, म्हणून तिने लाउंजमध्ये आराम करण्याचा निर्णय घेतला. मात्र, तिथे विश्रांती घेत असतानाच तिला एका भारतीय नंबरवरून व्हॉट्सॲप कॉल आला. “तुमच्या बॅगेत काहीतरी संशयास्पद वस्तू आहे,” असे तिला सांगण्यात आले. हे ऐकताच ती प्रचंड घाबरली. मात्र, प्रत्यक्षात तिला केवळ बॅगेतील ‘पॉवरबँक’ बाहेर काढण्यास सांगण्यात आले होते.
“चेक-इन बॅगेत बॅटरी ठेवू नका”; प्रवाशांना दिला सल्ला
वानजिपाने इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचे आणि विमानतळावरील स्टाफचे कौतुक केले. तिने सांगितले की, बॅगेतील पॉवरबँक काढल्यानंतर तिने एअरपोर्टवर काही खरेदी केली आणि ती नेपाळसाठी रवाना झाली. तिने प्रवाशांना एक महत्त्वाची सूचनाही दिली— “तुमच्या चेक-इन बॅगेत बॅटरी असलेली कोणतीही वस्तू किंवा वेप्स (Vapes) ठेवू नका, कारण सुरक्षा कारणास्तव ते काढण्यास सांगितले जाते.”
भारतीयांकडूनही प्रतिसादाचा वर्षाव
वानजिपाने शेअर केलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत १० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. “मुंबईला पुन्हा भेटायला नक्कीच आवडेल,” अशी भावना तिने व्यक्त केली. विशेष म्हणजे, तिच्या या व्हिडिओवर अनेक भारतीय युजर्सनी सकारात्मक कमेंट्स करत तिचे स्वागत केले आहे. नर्वसपणाने सुरू झालेला तिचा हा प्रवास शेवटी एका गोड आठवणीने संपला.
