Video : मैदानात हाणामारी, अफगाण गोलंदाजाला मारण्यासाठी पाकच्या फलंदाजाने उचलली बॅट

WhatsApp Group

PAK vs AFG: आशिया चषक 2022 च्या सामन्यात बुधवारी रात्री पाक आणि अफगाणिस्तानचे खेळाडू मैदानावर आमनेसामने आल्याने वातावरण खूपच तणावपूर्ण बनले. रागाच्या भरात पाकिस्तानी फलंदाजाने अफगाण गोलंदाजाला मारण्यासाठी बॅटही उचलली. यादरम्यान बाचाबाचीही झाली. सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये ही बाचाबाची पाहायला मिळाली.

शेवटच्या षटकांमध्ये सामना अतिशय रोमांचक स्थितीत पोहोचला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सलग विकेट घेत पाकिस्तानला बॅकफूटवर ढकलले होते. 130 धावांचे छोटे लक्ष्यही पाकिस्तानी फलंदाजांसाठी मोठे ठरत होते. 19व्या षटकात अफगाणिस्तानचा गोलंदाज फरीद अहमदने आसिफ अलीच्या रूपाने पाकिस्तानची 9वी विकेट घेत अफगाणिस्तानचा विजय जवळपास निश्चित केला होता. या विकेटनंतर आसिफ अली आणि फरीद यांच्यात लढत झाली.

फरीद अहमदने विकेट घेताच त्याच्या खास शैलीत सेलिब्रेशन केले. यानंतर आसिफ लगेच फरीद जवळ पोहोचला आणि दोघांमध्ये बाचाबाची झाली. येथे आसिफने प्रथम फरीदला ढकलले आणि त्यानंतर त्याला मारण्यासाठी बॅटही उचलली. हे पाहून अफगाणिस्तानच्या उर्वरित खेळाडूंनी मध्यस्थी करत दोघांनाही समज काढली.

या सामन्यात अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 129 धावा केल्या. एवढ्या कमी धावसंख्येनंतरही अफगाणिस्तान संघाने पाकिस्तानला जबरदस्त टक्कर दिली. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी ठराविक अंतराने विकेट घेत पाकिस्तानच्या फलंदाजांना हात उघडण्याची संधी दिली नाही. अफगाणिस्तानने शेवटच्या 5 षटकात 6 विकेट्स घेत सामना जवळपास जिंकला होता. शेवटच्या षटकात पाकिस्तानला विजयासाठी 11 धावांची गरज होती आणि त्यांची फक्त एक विकेट शिल्लक होती. इथे नसीम शाहने पहिल्या दोन चेंडूत दोन षटकार मारून सामना पाकिस्तानच्या झोतात टाकला.