लैंगिक संबंधांवेळी वेदना होतात का? 10 पैकी एका महिलेला जाणवतो त्रास; ‘या’ 4 गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

WhatsApp Group

लैंकिग आरोग्य हा मानवी जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, तरीही आपल्या समाजात या विषयावर उघडपणे बोलणे टाळले जाते. एका ताज्या संशोधनातून समोर आलेली आकडेवारी धक्कादायक आहे. जगात दर १० पैकी एका महिलेला लैंगिक संबंधांदरम्यान वेदना किंवा अस्वस्थता जाणवते. अनेकदा केवळ भीती आणि मानसिक दडपणामुळे शारीरिक वेदना वाढू शकतात. या विषयावर ‘रॉयल कॉलेज ऑफ ऑब्सटेट्रिशियन्स आणि गायनोलॉजिस्ट’च्या तज्ज्ञांनी मोलाचा सल्ला दिला असून जीवनात काही महत्त्वाचे बदल करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे म्हटले आहे.

संवाद हाच सर्वोत्तम उपाय

तज्ज्ञ एडी मॉरिस यांच्या मते, लैंगिक संबंधांमध्ये वेदना होण्याचे एक मुख्य कारण म्हणजे जोडीदारांमधील संवादाचा अभाव. जेव्हा दोघांच्या अपेक्षा, आवडी-निवडी वेगळ्या असतात, तेव्हा शारीरिक ओढाताण होऊ शकते. आपल्या जोडीदाराशी भावनिकदृष्ट्या जोडले जाणे अत्यंत आवश्यक आहे. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोललात, तर तुमची चिंता कमी होते. गोष्टी घाईने करण्याऐवजी पुरेसा वेळ घेणे आणि एकमेकांजवळ असण्याचा आनंद घेणे शारीरिक अस्वस्थता कमी करण्यास मदत करते.

चिंता आणि भीतीचा शारीरिक परिणाम

अनेकदा १६ ते २४ वयोगटातील तरुण-तरुणी पहिल्यांदा लैंगिक अनुभव घेताना अत्यंत तणावाखाली असतात. लैंगिक संबंधांबद्दलची घबराट किंवा भीती हेच वेदनांचे कारण ठरू शकते. जर वेदना केवळ एक-दोनदाच होत असतील आणि हळूहळू अनुभव सुधारत असेल, तर काळजी करण्याचे कारण नसते. मात्र, मनातील भीती घालवण्यासाठी योग्य माहिती घेणे गरजेचे आहे. मन शांत आणि रिलॅक्स असेल तरच तुम्ही या क्षणांचा आनंद घेऊ शकता.

सुरक्षितता आणि गर्भनिरोधकांवर चर्चा

लैंगिक संबंधांदरम्यान होणाऱ्या चिंतेचे आणखी एक मोठे कारण म्हणजे अनपेक्षित गर्भधारणा किंवा लैंगिक संसर्गजन्य रोगांची (STD) भीती. ही काळजी केवळ मुलींनाच नाही तर मुलांनाही असते. म्हणूनच, संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी गर्भनिरोधकांबद्दल (Contraception) चर्चा करणे फायदेशीर ठरते. कंडोमचा वापर तुम्हाला सुरक्षिततेची खात्री देतो, ज्यामुळे मनातील भीती निघून जाते आणि शारीरिक संबंध अधिक सुखद होतात.

वैद्यकीय सल्ला कधी घ्यावा?

जर लैंगिक संबंधांदरम्यान होणाऱ्या वेदना दीर्घकाळ टिकून राहत असतील किंवा प्रत्येक वेळी त्रास होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते. अशा वेळी घरगुती उपाय करण्याऐवजी तज्ज्ञ डॉक्टरांचा किंवा स्त्रीरोगतज्ज्ञांचा सल्ला घेणे अनिवार्य आहे. वेदनांचे कारण एखादा अंतर्गत संसर्ग किंवा अन्य वैद्यकीय समस्या असू शकते. वेळेवर निदान झाल्यामुळे जीवनाचा दर्जा सुधारण्यास मदत होते.