सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या बोगस प्रवेश प्रकरणी चौकशीचे आदेश

WhatsApp Group

सावंतवाडी – सावंतवाडी तालुक्यातील सांगेली येथील नवोदय विद्यालयाच्या बोगस प्रवेश प्रकरणाची जिल्हा प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून या प्रवेश प्रक्रियेची सखोल चौकशी व्हावी यासाठी जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्रिसदस्यीय समिती गठीत केली आहे.

या समितीला चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या असून दोषी आढळल्यास संबंधितावर कारवाई होणार असे संकेत जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आले. त्यामुळे चौकशी समितीच्या निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सांगेली येथील जवाहर नवोदय विद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी परजिल्ह्यातील विद्यार्थी जिल्ह्यातील काही शाळांमध्ये बोगस रित्या प्रवेश घेतात. जिल्ह्यातील शाळांमध्ये दाखल होतात. मात्र ते प्रत्यक्षात शाळेत उपस्थित राहत नाहीत. परजिल्ह्यातील खासगी क्लासेस करून नवोदय विद्यालयाच्या प्रवेश प्रक्रिया परीक्षा देतात यामध्ये त्यांचा नंबर लागतो.

आणि जिल्ह्यातील मुले या विद्यालयाच्या प्रवेशापासून वंचित राहतात. याकडे जिल्हा परिषद शिक्षण समिती सभेत वारंवार आवाज उठविला जात होता परंतु यावर ठोस कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आलेली नव्हती.

तसेच आता नव्याने प्रवेश प्रक्रिया करण्यासाठी परीक्षा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या परीक्षेचे हॉल तिकीट पाहता अनेक विद्यार्थी हे परजिल्ह्यातील आहेत हे समोर आलं. याविरोधात सामजिक कार्यकर्ते यांनी शिक्षणाधिकरी यांचे लक्ष वेधले होते तर बुधवारी युवासेनेच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधण्यात आले होते. यावर काल जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.