तरुणांसाठी मोठी बातमी! सैन्यदलात ४ वर्षे काम करण्याची मिळणार संधी, अग्निपथ भरती योजनेची घोषणा

WhatsApp Group

सैन्यात भरती होऊन देशसेवेचं स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज मंगळवारी अग्निपथ भरती योजनेची घोषणा केली आहे. अग्निपथ योजनेंतर्गत देशातील तरुण चार वर्षांच्या कालावधीसाठी सैन्यामध्ये भरती होऊन देशाची सेवा करतील. एवढेचं नव्हे तर, चार वर्षांनंतर यामधील सुमारे ८० टक्के सैनिकांना कर्तव्यातून मुक्त केले जाईल. तसेच त्यांना पुढील रोजगाराच्या संधींसाठी सशस्त्र दलांकडून मदतही मिळेल.

त्याचबरोबर उरलेल्या २० टक्के सैनिकांना तिन्ही सेना दलात काम करण्याची पुन्हा संधी मिळणार आहे. या योजनेला ‘टूर ऑफ ड्यूटी’ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे, भारतीय सैन्यात नोकरी करणाऱ्या जवानाचे वय ३५ वरून सरासरी २५ वर्षांपर्यंत कमी होईल. ही योजना संरक्षण दलांचा खर्च आणि वय कमी करण्याच्या दिशेने सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग आहे. अग्निपथ योजनेंतर्गत लष्कराच्या तिन्ही दलांमध्ये पहिल्या वर्षी ४५ हजारांहून अधिक तरुणांची भरती होऊ शकते.

‘टूर ऑफ ड्यूटी’ अंतर्गत भरती झालेल्या तरुणांना चार वर्षांमध्ये दरमहा अंदाजे ३०,००० एवढे वेतन दिले जाईल. या वेतनामधून ९००० रुपये सरकार राखून ठेवतील. चार वर्षांचा कार्यकाळ संपल्यानंतर सरकार हे पैसे देणार आहे. याचा फायदा असा होईल की २१ वर्षांच्या तरुणांसाठी १० लाख किंवा त्याहून अधिक रकमेची व्यवस्था केली जाईल, जेव्हा सैन्यामध्ये भरती झालेला तरुण जवान ४वर्षे सेवा केल्यानंतर परत येईल. तेव्हा त्याला ही रक्कम दिली जाईल.