लोकशाही रक्षणासाठी देशावर प्रेम असणारेच काम करू शकतात: असीम सरोदे

WhatsApp Group

हक्काधारीत दृष्टिकोन असला की अभावापासूनच नाही तर भयापासून मुक्ती मिळविण्यासाठी प्रयत्न करण्याची ताकद मिळते. सन्मानाने व प्रतिष्ठीत जीवन जगण्याच्या हक्कांचा संबंध नागरिकांचा विकासाची धोरणे, लोकनिधींचा वापर व जनतेच्या भल्यासाठी नियोजन यामध्ये सहभाग वाढविण्याशी आहे. हक्काधारीत दृष्टीकोन कोणत्याही राजकीय पक्ष किंवा व्यक्तिविरोधात नसतो पण जनतेच्या हक्कांना बाधा पोहोचविण्याऱ्यांचा विरोध म्हणजे त्यांचा द्वेष करणे असे नसल्याचे मत जेष्ठ संविधानतज्ञ ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी व्यक्त केले.

बार्शीतील सावळे सभागृहात आयोजित “अभिव्यक्ती स्वातंत्र्य उत्सव” विशेष मानवी हक्क कार्यशाळेत कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माहिती अधिकार कार्यकर्ते दिनानाथ काटकर, प्रमुख पाहुणे बार्शी वकील संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अविनाश जाधव, रोटरी क्लबचे अध्यक्ष विजयश्री पाटील, रोटरी क्लबचे प्रोजेक्ट मॅनेजर ॲडव्होकेट विक्रम सावळे, जन आंदोलनाचा राष्ट्रीय समन्वयाचे तालुका समन्वयक मनीष देशपांडे, मानवी हक्क संरक्षण आणि जागृती या संस्थेचे तालुकाध्यक्ष आकाश दळवी उपस्थित होते तर बालाजी डोईफोडे, ॲडव्होकेट सुहास कांबळे, किशोर कांबळे, दयानंद पिंगळे, दत्ता दळवी, दत्ता पाटील, सुरेश चकोर, दादा पवार, निलेश मुद्दे, प्रमिला झोंबाडे, अविनाश कांबळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.

हक्क व कर्तव्य दोन्ही समजून घ्यावे लागतील तरच हक्काधारीत दृष्टीकोन प्राप्त होईल असे सांगून ॲड.असीम सरोदे म्हणाले की, वंचित घटकांचे प्रश्न समजून घेण्यासाठी विषमता तसेच भेदभाव निर्माण होण्याची प्रक्रिया आधी समजून घ्यावी लागेल.

मूलतत्त्ववादी, धर्मांध लोक कोण आहेत हे ओळ्खतांना हे लक्षात ठेवावे की ते सगळ्या धर्मात व जातीत असतात, ते लोकशाहविरोधी असतात, त्यांना धर्मनिरपेक्षता मान्य नसते, त्यांना धर्मांधतेवर आधारित समाज निर्माण करायचा असतो, ते स्त्री समानतेच्या विरोधी असतात अश्या लोकांना लोकशाहीच्या मार्गावर आणणे हे मानवीहक्क व संविधाकता यांच्यासाठी आवश्यक वातावरण तयार करण्यातील महत्वाचे काम आहे. लोकशाहीची समज वाढविण्यासाठी देशावर प्रेम असणारे नागरिकच काम करू शकतात कारण ते एखाद्या राजकीय पक्षासाठी किंवा धर्मांधतेसाठी काम करण्यासारखे सोपे नाही असे परखड मत सुद्धा ॲड.असीम सरोदे यांनी व्यक्त केले.