
ठाणे: ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरात शुक्रवारी पहाटे दोन मजली व्यावसायिक इमारत कोसळून एका 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. शहरातील खडियापार परिसरात पहाटे साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. इमारत कोसळल्यानंतर लगेचच अग्निशमन दलाच्या दोन पथकांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ढिगाऱ्याखाली दबल्यामुळे 37 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. अग्निशमन विभागाच्या सूत्रांनी सांगितले की, ढिगाऱ्याखाली दबलेल्या आणखी एकाला वाचवण्यात यश आले असून त्याला कोणतीही दुखापत झाली नाही.
Maharashtra | One person dead, one safely rescued after a portion of a building collapses in Bhiwandi, says Thane Municipal Corporation. pic.twitter.com/oz6SYWL1qG
— ANI (@ANI) January 27, 2023
अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर माजिद अन्सारी यांचा मृतदेह बाहेर काढला आणि ढिगाऱ्यात अडकलेल्या अशरफ नागौरी यांना सुखरूप बाहेर काढले. यादरम्यान स्थानिक पोलिसही अग्निशमन विभागासोबत सज्ज होते आणि मदत आणि बचाव कार्यात मदत करत होते.