‘ओमिक्रॉन’ या कोरोना व्हेरियंटनं सध्या संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. त्याला कारणही तसंच आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाच्या या नव्या प्रकाराला ‘व्हेरियंट ऑफ कन्सर्न’ असं म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून या व्हेरियंटला B.1.1.529 असं नाव देण्यात आलं आहे. कोरोनाच्या इतर विषाणूंच्या ग्रीक नावांप्रमाणे ओमिक्रॉन हे नाव सध्या सर्वपरिचित आहे.या व्हेरियंटमध्ये मोठ्या प्रमाणात म्युटेशन्स आढळत असल्यानं याचा प्रसार वेगानं होत आहे.
रोगप्रतिकारशक्ती आणि मोनोक्लोनल अँटिबॉडीजला चकवा देण्याची क्षमता या व्हेरियंटमध्ये आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य सचिवांनी याबाबत सर्व राज्यांना पत्र लिहिलं आहे. राज्यांमधील कोरोना टास्क फोर्ससुद्धा यामुळे सतर्क झाल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेतून पसरलेल्या या व्हेरियंटनं भारतासह संपूर्ण जगात हातपाय पसरायला सुरुवात केली आहे. या नव्या व्हेरियंटमध्ये एकुण ५० म्युटेशन्स आढळले आहेत. त्यापैकी ३० पेक्षा अधिक स्पाईक प्रोटीनवर आढळले आहेत. कोरोनाच्या बहुतांश लशी स्पाईक प्रोटीनवर लक्ष्य करणाऱ्या आहेत.
मात्र, ओमिक्रॉन लशीचा प्रभाव कमी करण्यास सक्षम असल्याचा गंभीर इशारा नुकताच जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे. जवळपास २ वर्षांपासून असलेला कोरोनाचा घट्ट विळखा सैल होत असतानाच नव्या व्हेरियंटच्या एन्ट्रीनं सर्वसामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराच्या भीतीनं जगभरातील शेअर मार्केटमधील निर्देशांक घसरले आहेत. क्रिप्टो करंन्सीची अवस्था नाजूक आहे. ओमिक्रॉनचा प्रसार झालेल्या अनेक देशांमधील हवाई वाहतूक व्यवस्था प्रभावित झाली आहे. याचा थेट फटका ट्रॅव्हल आणि टुरिझम कंपन्यांना बसत आहे. एअरलाईन्स कंपन्यांच्या नफ्यावरही याचा परिणाम होत आहे. पर्यटन व्यवसायावरील हे संकट आटोक्यात न आल्यास हॉटेल व्यावसायिक आणि पर्यायानं संबंधित उद्योगांनाही याचा मोठा आर्थिक फटका बसू शकतो.
गेल्या वर्षी लॉकडाऊनमध्ये अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. लघू आणि मध्यम उद्योग तर देशोधडीला लागले. विस्कटलेली आर्थिक घडी सावरत असतानाच ओमिक्रॉनच्या संकटानं डोकं वर काढलं आहे. परदेशातून येणाऱ्या कच्च्यामालासंदर्भात जर सरकारने निर्बंध कठोर केले, तर उद्योगधंद्यांची वाट आणखी बिकट होणार आहे. नव्या व्हेरियंटमुळे कुठलेही निर्बंध किंवा लॉकडाऊन सहन करण्याची मानसिकता सध्या उद्योजकांची नाही.
राज्यातील काही भागातील शाळा सुरु असल्या तरी यावर अजुनही विविध घटकांमध्ये मतभेद आहेत. याबाबतचा सरसकट निर्णय येत्या १५ डिसेंबरला राज्य सरकार घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. शाळेत नुकताच किलबिलाट सुरु झाला असताना ओमिक्रॉनमुळे ऑनलाईन शाळा कराव्या लागल्यास विद्यार्थ्यांचाही हिरमोड होईल.एकुणच नवनव्या व्हेरियंटमुळे कोरोना महामारीचं हे संकट अजून दिर्घकाळ चालण्याची शक्यता जास्त आहे. या व्हेरियंटचा प्रसार रोखण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. मात्र, मास्क, सॅनिटायझर वापरणं, सामाजिक अंतर ठेवणं या कोरोनापासून बचावाच्या त्रीसूत्रीचा वापर सर्वसामान्यांनी सुरु ठेवल्यास याचा प्रसार आटोक्यात ठेवण्यात मदत होऊ शकते.