विद्यार्थ्यांना दिलासा; विद्यापीठाच्या ऑफलाइन परीक्षांसाठी आता प्रत्येक तासामागे १५ मिनिटे वाढीव वेळ
मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्यामुळे, ऑफलाईन पद्धतीनं परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास १५ मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे.
उदय सामंत यांना या संदर्भात युवा सेनेने पाठवलेल्या मागणी पत्रामध्ये म्हटले होते की, ”मागील दोन वर्षांत कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील सर्व अभ्यासक्रमांच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आल्या होत्या. आता परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे उच्च व तंत्रशिक्षण विभागाने व विद्यापीठांनी व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीने घेण्याचं ठरवलं आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण व परीक्षा ऑनलाईन पद्धतीने झाल्यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनाचा सराव कमी झाल्याने, ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेताना वेळ वाढवून देण्याची मागणी होत होती, ऑफलाईन परीक्षांसाठी प्रती तास 15 मिनिटे वाढीव वेळ देण्याचा निर्णय कुलगुरूंच्या बैठकीत घेण्यात आला. pic.twitter.com/lIzcBhXJ7a
— Uday Samant (@samant_uday) April 13, 2022
तसेच, या संदर्भात अनेक विद्यार्थ्यांचे देखील असे म्हणणे आहे की, दोन वर्षे (एमसीक्यू) बहुपर्यायी प्रश्न या पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. त्यामुळे पेपेर लिहिण्यासाठी आवश्यक असलेला लिखाणाचा सराव राहिला नाही. त्यामुळे व्यावसायिक आणि अव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना पेपर लिहिण्यासाठी जो वेळ ठरवून दिलेला आहे. त्यापेक्षा अर्धा, एक तास वेळ वाढवण्यात यावा. जेणेकरून मुलांना वेळेत पूर्ण पेपर लिहिता येईल व त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. या पत्रावर युवासेना सचिव वरूण सरदेसाई आणि कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे यांची स्वाक्षरी होती.