दरेकर अडचणीत! मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकरांना सहकारची नोटीस
मुंबै बँकेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते ना. प्रवीण दरेकर यांना सहकार खात्याने नोटीस पाठवली असून ‘आपण मजूर असल्याचे दिसत नाही, आवणाला अपात्र का घोषित करू नये?’, असा सवाल या नोटीशीच्या माध्यमातून केला आहे. या नोटीसीला २१ डिसेंबरपर्यंत उत्तर देण्यासाठी मुदत देण्यात आली आहे.
मुंबै बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर हे मजूर मतदारसंघातून बँकेवर निवडून येतात. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेतदेखील त्यांनी याच मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करणारा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यालाच काहीजणांनी हरकत घेतली आहे. या पार्श्वभूमीवर आपले मासिक उत्पन्न अडीच लाख रुपये आहे, आपण मजूर दिसत नाही, नोटीसीमध्ये नमूद करण्यात आले आहे. दरेकर खरेच मजूर आहेत की नाहीत याची चौकशी करुन शहानिशा करण्याचे आदेश खात्याकडून देण्यात आले आहेत.
दरेकरांना मुदत या नोटीसीला उत्तर देण्यासाठी दरेकर यांना २१ डिसेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. या चौकशीचा अहवाल आल्यानंतर दरेकर यांच्यावर अपात्रतेची कारवाई होते का? याबाबतचा निर्णय घेतला जाणार आहे. या नोटीसीमध्ये मजूराची व्याख्यादेखील स्पष्ट करण्यात आली आहे. प्रवीण दरेकर यांच्या मासिक उत्पन्नाचा दाखला देत प्रथमदर्शनी आपण मजूर असल्याचे दिसत नाही, असंही या नोटीसीत म्हटले आहे. मजूरीच्या साधनसामुग्रीवर ज्या व्यक्तीची उपपजिविका असेल, शारीरिक श्रमाचे काम करणारी व्यक्ती असेल तर ती त्या व्याख्येत बसते.
प्रवीण दरेकर यांनी महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्यावेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात आपले उत्पन्नाचे साधन स्वतंत्र व्यवसाय असे नमूद केले आहे. याचाही उल्लेख या नोटीसीमध्ये करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आपणाला अपात्र का घोषित करू नये, असा सवाल सहकार खात्याने दरेकरांना केला आहे.
मुंबै जिल्हा सहकारी बँकेची निवडणूक होत असून त्या पार्श्वभूमीवर दरेकरांना बजावलेली ही नोटीस महत्त्वपूर्ण मानली जात आहे. मजूरांचे प्रतिनिधी म्हणून दरेकर मुंबै बँकेवर निवडून आले आहेत. सध्या सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेसाठीदेखील त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून ते बिनविरोध निवडून येणार हेदेखील स्पष्ट झाले आहे.
सदस्यांचा आक्षेप निवडणुकीची मतदारयादी निश्चित झाल्यानंतर २० नोव्हें. २०२१ रोजी संभाजी भोसले, अंकुश जाधव, अरुण फडके, अशोक पवार आणि दत्तात्रय बुरासे यांनी दरेकर हे मजूर असल्याबाबत निवडणूक अधिकाऱ्यांकडे आक्षेप घेतला आहे.