मुंबईसारखं शहर नाही, मला मुंबईचा अभिमान आहे – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

WhatsApp Group

मुंबई – मुंबईचा मला अभिमान आहे. मी सच्चा मुंबईकर आहे. त्यामुळे मुंबईतील विकास कामे जागतिक दर्जाची असतील याकडे शासन कटाक्षाने लक्ष देईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या विधानसभा नियम 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्तावावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री शउद्धव ठाकरे बोलत होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोविड कालावधीत राज्य शासनाने वैद्यकीय संसाधने, ऑक्सीजनची कमी असतांना हजारो किलोमीटर वरून रिकामे टँकर पाठवून, एअर लिफ्ट करून ऑक्सीजन आणला. यासाठी रात्रंदिवस आपली यंत्रणा कार्यरत होती, मुख्यमंत्री म्हणून मला या यंत्रणेचा अभिमान आहे.

स्कॉटलँण्ड येथील वातावरणीय बदल परिषदेत महाराष्ट्राने प्रादेशिक पुरस्कार जिंकला. कोविड काळात 5 रुपयात आणि नंतर मोफत जेवण दिले. गोरगरीबांचे पोट यातून भरले आजपर्यंत 8 कोटी थाळ्यांचे वितरण आपण शिवभोजन योजनेत केले. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यासाठी आपण 500 कोटी रुपये दिले आहेत. हिंदू ह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाचे 70 टक्के काम झाले आहे. सागरी किनारी मार्गाचे 50 टक्के काम झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबईसारखं शहर नाही. मला मुंबईचा अभिमान आहे. मुंबई महापालिकेच्या शाळेत आपल्या मुलांना प्रवेश मिळावा यासाठी रांग लागते. आठ भाषेतून शिक्षण देणारी मुंबई एकमेव पालिका आहे. विद्यार्थ्यांना टॅब देत आहोत. 15 हजार शौचालयांचे काम केले आहे. 500 चौ. फुटाच्या घराला मालमत्ता करातून पूर्ण सवलत दिली आहे. निवडक दवाखान्यात बाळासाहेब ठाकरे आरोग्य योजना सुरु केली. काही चाचण्या मोफत तर काही माफक दरात करत आहोत, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

मुंबईने कोविड काळात जे काम केले ते मुंबई मॉडेल म्हणून जगभरात प्रसिद्ध झालं. फिल्ड हॉस्पीटल, जम्बो हॉस्पीटल उभारले.सफाई कामगारांच्या घराचा विषय असेल तो शासनाने मार्गी लावला आहे. 2 तारखेला मराठी भाषा भवनाचे भूमीपुजन अतिशय दिमाखाने करत आहोत. बीडीडी चाळीचा प्रश्न मार्गी लावला आहे. डबेवाला भवनाला जागा दिली आहे.

वरळी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय उभे करत आहोत. मुंबईत मेट्रो रेल्वे ची कामे सुरु आहेत. मात्र मेट्रो प्रकल्पाच्या किंमतीत वाढ कशी झाली याची चौकशी केली जाईल. सौर उर्जा प्रकल्प उभे करत आहोत. पर्यावरणाच्यादृष्टीने इलेक्ट्रिक बसेस आणतो आहोत. पर्यावरणाची हानी होऊ न देता शाश्वत विकासाला शासनाचे प्राधान्य आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.