हनुमान जयंतीला हिंसाचार झालेल्या जहांगीरपुरीत मोठी कारवाई; अनधिकृत दुकाने आणि घरांवर बुलडोझर

WhatsApp Group

दिल्लीच्या जहांगीरपुरी भागामध्ये शनिवारी हनुमान जन्मोत्सवाच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आल्यानंतर झालेल्या हिंसाचारामध्ये अनेक पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. समाजकंटकांनी या यात्रेवर दगडफेक केली होती, तसेच अनेक वाहने पेटवून देण्यात आली होती.

या हिंसाचारामध्ये आठ पोलीस कर्मचाऱ्यांसह नऊ जण जखमी झाले आहेत. दिल्ली पोलीस याप्रकरणी तपास करत असून आतापर्यंत २५ जणांना अटक केली असून दोन अल्पवयीन ताब्यात आहेत. दरम्यान पालिकेने दंगलग्रस्त भागामधील अनधिकृत बांधकांमावर कारवाई सुरु केली आहे.

दिल्लीच्या भाजपा प्रदेशाध्यक्षांनी दंगलीमधील आरोपींनी जहांगीरपुरीमध्ये अनेक अनधिकृत बांधकामं उभी केल्याचा दावा करत यावर कारवाईची मागणी केली होती. यानंतर पालिकेने अनधिकृत बांधकामांवर कारवाई करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार कारवाईला सुरुवात झाली असून बुल्डोझरच्या सहाय्याने अनधिकृत दुकानं, घरं तोडली जात आहेत. दोन दिवस ही कारवाई सुरु राहणार असून कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी ४०० पोलीस तैनात करण्याची मागणी पालिकेकडून करण्यात आली आहे.