नुकसानग्रस्त एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

WhatsApp Group

धाराशिव, दि. 11 (जिमाका) : अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाचे पंचनामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येणार असून त्याबाबतचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. या संकटकाळात राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या पाठिशी असून एकही नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.

धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी अवकाळी पाऊस, गारपिटीने झालेल्या नुकसानाची पाहणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली त्यानंतर वाडी बामणी (ता. धाराशिव) येथे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील, माजी खासदार रवी गायकवाड, विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, छत्रपती संभाजी नगरचे विशेष पोलिस महानिरीक्षक के. एम. एम. प्रसन्ना, जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता, पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

अवकाळी पाऊस, वादळी वारे आणि गारपिटीने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे. शेतकरी कुटुंबातील असल्याने आपल्याला शेतकऱ्यांवर कोसळलेल्या संकटाची जाणीव आहे. त्यामुळे या नुकसानाची माहिती घेण्यासाठी आपण शेतात आलो असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

राज्य शासन सदैव शेतकऱ्यांसोबत असून शेतकऱ्यांच्या हितासाठी शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची अधिक भरपाई शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी एनडीआरएफच्या दुप्पट मदत देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. तसेच सततच्या पावसाचा समावेश नैसर्गिक आपत्तीमध्ये करण्याचा निर्णयही राज्य शासनाने घेतला आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे असून अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना दिली जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.

धाराशिव जिल्ह्यात 8 एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीने शेतपिके, फळबागांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक अंदाजानुसार जिल्ह्यात 2 हजार 500 हेक्टर क्षेत्रावरील शेतपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच 20 मोठी जनावरे दगावली असल्याची माहिती, जिल्हा प्रशासनाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत, आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी तुळजापूर येथे तुळजाभवानीचे दर्शन घेतले.

 मोर्डा, वाडी बामणी येथे शेतकऱ्यांशी संवाद

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुळजापूर तालुक्यातील मोर्डा येथील श्रीमती सीताबाई उत्तम सुरवसे आणि उत्तम सुरवसे या शेतकरी दाम्पत्याच्या द्राक्ष बागेची पाहणी केली. दोन एकर क्षेत्रावरील द्राक्ष बाग वादळी पावसाने भुईसपाट झाली आहे. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी सुरवसे दांपत्याची आपुलकीने विचारपूस केली. त्यांना धीर दिला. राज्य शासन आपल्या पाठिशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही दिली. सुरवसे यांच्या भुईसपाट झालेल्या द्राक्ष बागेत मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी नुकसानाची पाहणी केली.

धाराशिव तालुक्यातील वाडी बामणी येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. येथील बाबासाहेब उंबरदंड आणि साधना उंबरदंड या शेतकरी दाम्पत्याच्या कलिंगड आणि ड्रॅगन फ्रूट बागेच्या नुकसानीची पाहणी केली.