नीतीश कुमारांचा बिहारला ‘रामराम’! दिल्लीत जाणार राज्यसभा खासदार म्हणून; बिहारच्या पुढच्या मुख्यमंत्रिपदाबाबत सस्पेन्स वाढला
पाटणा: बिहारच्या राजकारणात आज एक अत्यंत मोठा आणि धक्कादायक बदल पाहायला मिळाला आहे. अनेक दशकांपासून बिहारच्या सत्तेची सूत्रे सांभाळणारे ‘सुशासन बाबू’ अर्थात मुख्यमंत्री नीतीश कुमार यांनी आता बिहार सोडण्याची अधिकृत घोषणा केली आहे. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आता त्यांनी बिहार सोडून दिल्लीत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला आहे. या घोषणेनंतर बिहारसह देशाच्या राजकारणात खळबळ उडाली असून, १५ एप्रिल रोजी होणाऱ्या नव्या सरकारच्या शपथविधीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
दिल्लीत असेल नवे ठिकाण
नीतीश कुमार आता राज्यसभेच्या माध्यमातून देशाच्या राजधानीत आपली नवी राजकीय खेळी सुरू करणार आहेत. विशेष म्हणजे, दिल्लीतील द्वारका परिसरात नीतीश कुमार यांचा स्वतःचा एक हजार स्क्वेअर फूटचा फ्लॅट असून, ज्याची किंमत सुमारे दीड कोटी रुपये आहे. आता हाच फ्लॅट नीतीश कुमारांचे नवीन ठिकाण असणार आहे. राज्यसभेची शपथ घेतल्यानंतर नीतीश कुमार पाटण्याला परतले असून, आता ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पुढील औपचारिकता पूर्ण करणार आहेत.
कोण होणार बिहारचा नवा मुख्यमंत्री?
नीतीश कुमारांच्या या निर्णयानंतर बिहारचा पुढचा मुख्यमंत्री कोण? हा प्रश्न सध्या ऐरणीवर आला आहे. राजकीय वर्तुळातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपचे नेते सम्राट चौधरी यांचे नाव या शर्यतीत सर्वात पुढे आहे. १५ एप्रिल रोजी नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, अद्याप कोणत्याही नावावर अधिकृत शिक्कामोर्तब झालेले नाही.
“नीतीश नाही तर निशांत हवा!” – कार्यकर्त्यांची नवी मागणी
एकीकडे भाजपच्या मुख्यमंत्रिपदाची चर्चा सुरू असताना, दुसरीकडे जेडीयू (JDU) कार्यकर्त्यांनी वेगळीच मागणी लावून धरली आहे. पाटण्याच्या रस्त्यांवर सध्या मोठे पोस्टर्स आणि बॅनर्स झळकत आहेत, ज्यावर “नीतीश नाही तर निशांत हवा!” असे स्लोगन लिहिले आहे. कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की नीतीश कुमार यांनी आपला मुलगा निशांत कुमार याला बिहारच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सोपवावी. आता नीतीश कुमार आपल्या मुलाला राजकारणात लाँच करणार की भाजपचा नेता मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
