‘या’ व्हायरल VIDEO वरून नितीन गडकरी संतापले, दिला कारवाईचा इशारा

WhatsApp Group

मुंबई : गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये केंद्रीय मंत्री गडकरी माझं मंत्रिपद गेलं तरी चालेल मला फरक पडत नाही, असं म्हणत असल्याचे दिसत आहे. आता या व्हिडिओवरून नितीन गडकरी चांगलेच संतापले आहेत, त्यांनी या संदर्भात कारवाईचा इशारा दिला आहे. काही माध्यम संस्था आणि व्यक्तींकडून सुरू असलेल्या खोट्या प्रचाराचं सत्य, असं म्हणत नितीन गडकरींनी एक व्हिडिओ (Video) ट्विट केला आहे.

नितीन गडकरी व्हिडिओमध्ये जुनी कहाणी सांगत आहेत, पण यामध्ये फेरफार करून चुकीच्या पद्धतीने दाखवलं जात असल्याचं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे. आपचे नेते संजय सिंग यांनी नितीन गडकरी यांचा व्हायरल व्हिडिओ शेअर केल्याचं गडकरींनी ट्वीट केलेल्या व्हिडिओमध्ये दिसत आहे.

गडकरी यांनी हा व्हिडिओ ट्विट करत त्यासोबत अजून एक व्हिडिओ शेअर केला आहे. आज पुन्हा काही माध्यमे, सोशल मीडिया आणि व्यक्तींनी माझ्या वक्तव्यांचा वापर करत माझ्याविरुद्ध वाईट आणि बनावट प्रचार करून राजकीय फायदा करून घ्यायचा प्रयत्न केला आहे. सरकार, पक्ष आणि मेहनत घेणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या हितासाठी मी त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करायला मागे पुढे पाहणार नाही. मी या व्हिडिओमध्ये काय म्हणालो आहे, याची लिंक मी शेअर करत आहे, असं ट्विट नितीन गडकरी यांनी केले आहे.