फडणवीस मुख्यमंत्री होतील त्यावर्षी ‘या’ व्यक्तीला नितेश राणे देणार मर्सिडिज गाडी

WhatsApp Group

पिंपरी-चिंचवडमध्ये भरवण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीची मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रभरामध्ये चर्चा होती. या शर्यतीची चर्चा असण्याचं कारण म्हणजे दीड कोटींच्या बक्षिसांमुळे चर्चेत होती. जेसीबी, बोलेरो, ट्रॅक्टर, बुलेट, ११६ दुचाकी अशी बक्षिसं या स्पर्धेसाठी ठेवण्यात आली होती. यापैकी, रामनाथ वारिंगे यांच्या बैलजोडीने अवघ्या ११:२२ सेकंदामध्ये घाट सर करत जेसीबीचं बम्पर प्राइज जिंकलं आहे. या गाड्याबरोबरच इतर चार बैलजोड्यांनी कमी वेळात ही घाट सर केला. त्यानंतर जेसीबी पाच जणांमध्ये विभागून देण्यात आला आहे.

महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या या बैलगाडा शर्यतीला राजकारणीही उपस्थित होते. चिखली येथील या शर्यतींसाठी काल राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे आमदार नितेश राणेही उपस्थित राहिलेले. या बैलगाडा शर्यती पाहून नितेश राणे इतके भारवून गेले की त्यांनी यावेळी एक मोठी घोषणा केली.

नितेश राणेंनी ट्विटरवरुन या स्पर्धेला उपस्थित राहिल्याचा एक व्हिडीओ शेअर केलाय. यामध्ये नितेश राणे हे स्टेजवर असून समोर बैलगाडा शर्यती सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. नितेश राणे यांनी या पोस्टमध्ये भोसरी मतदारसंघाचे आमदार आणि पिंपरी-चिंचवडचे भाजपा शहराध्यक्ष महेश लंगडे यांना टॅग करत देवेंद्र फडणवीसांचा संदर्भ देत एक घोषणा केली आहे.

“ज्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा.श्री.देवेंद्रजी साहेब होतील त्या वर्षी आमदार महेशदादा दादा यांच्यामार्फत भरवण्यात येणाऱ्या बैलगाडा शर्यतीच्या घाटाच्या राजाला (फायनल सम्राटला) माझ्याकडून मर्सिडिज गाडी बक्षीस म्हणून देण्यात येईल.” नितेश राणे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.