मुंबई : नव्या संसदेच्या उद्घाटनावर बहिष्कार घालणार्यांना सडेतोड प्रत्युत्तर देत भाजप आमदार नितेश राणे यांनी आज पत्रकार परिषद घेत हल्लाबोल केला. संजय राऊत यांच्या नावाचा पूर्ण उल्लेख सतत करण्याबाबत नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत दुसर्यांबद्दल बाप चोरणारी टोळी असं म्हणतात पण यांना स्वतःच्या वडिलांबद्दल कितपत माहिती आहे? त्यांना त्यांच्या वडिलांची आठवण व्हावी म्हणून मी संजय राजाराम राऊत असा उल्लेख करतो.
पुढे ते म्हणाले की, “संजय राऊतांनी चाटूगिरीमध्ये पीएचडी केली आहे. कधी ते राष्ट्रवादीची चाटूगिरी करतात, कधी काँग्रेसची आणि वेळ मिळाला तर उद्धव ठाकरेंची चाटूगिरी करतात. संजय राऊतांनी सध्या काँग्रेसची चाटूगिरी करण्याचा उच्चांक गाठला आहे. संसद भवनाच्या उद्घाटनावर बहिष्कार घालण्याचा काँग्रेसने जो निर्णय घेतला आहे, तो किती योग्य आहे, हेच सध्या संजय राऊत पटवून देत आहेत. आदिवासी राष्ट्रपती महिलेवर अन्याय होतोय, असं वारंवार सांगण्याचं काम चाटूगिरीचे प्रमुख संजय राऊत करत असतात”.
काँग्रेसला आदिवासी महिला असलेल्या द्रौपदी मुर्मूंबद्दल एवढाच पुळका येत असेल, तर राष्ट्रपती निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांच्याविरोधात काँग्रेसने उमेदवार का दिला?, असा सवाल नितेश राणेंनी केला. काँग्रेसच्या एका नेत्याने राष्ट्रपतींचा ‘राष्ट्रीय पत्नी’ असं संबोधून अपमान केला होता. मग तेव्हा राहुल गांधी व त्यांच्या अन्य चमच्यांनी त्या नेत्याचा जाहीर निषेध का केला नाही? तो नेता आजही काँग्रेसमध्ये आहे, असं नितेश राणे म्हणाले.
देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या काँग्रेसच्या होत्या. त्यावेळी त्यांनी भारतात आणीबाणी लागू केली होती व विरोधकांना जेलमध्ये टाकत हुकूमशाही केली होती. संजय राऊत व उद्धव ठाकरेंचा ज्या काँग्रेसच्या मांडीवर बसून नंगा नाच सुरु आहे त्या काँग्रेसने आपल्या देशामध्ये मुस्काटदाबी करण्याचं काम केलेलं आहे, असा आरोप नितेश राणेंनी केला.
प्रत्येक गोष्टीला संजय राऊतांचा विरोध असतो, यांच्याइतका मोठा देशद्रोही नाही. राऊत जर असतील तर बाळासाहेबांच्या स्मारकाचं काम पूर्ण होणार नाही, त्यामुळे तुम्हाला झेपत नसेल तर याची जबाबदारी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीसांकडे सोपवा, असं म्हणत मुंबईत सध्या सुरु असलेल्या विकास कामांचा आढावा यावेळी नितेश राणेंनी घेतला. ( Nitesh Rane on Sanjay Raut )