मुंबई – कोल्हापुरमध्ये उपचारादरम्यान माझ्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा खळबळजनक दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. ते विधानसभेच्या सभागृहामध्ये बोलत होते.नितेश राणे म्हणाले की, मी कोल्हापुरमधील रुग्णालयात अॅडमिट असताना अचानक डॉक्टरांनी मला सीटी एन्जिओ टेस्ट करण्याची गरज असल्याचे सांगितले. पण एका कर्मचाऱ्याने मला येऊन सांगितलं की साहेब, हे सीटी एन्जिओ करु नका. त्या निमित्तानं इंक तुमच्या शरीरात टाकली जाईल आणि त्यामधून तुम्हाला मारुन टाकण्याचा प्लॅन आहे. या कर्मचाऱ्याने मला आधीच सांगितल्यामुळे मी जिवंत राहिलो, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीवेळी चांगलेच राजकारण रंगले होते. शिवसैनिक संतोष परब हल्ला प्रकरणामध्ये नितेश राणे यांना न्यायालयाकडून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. मात्र, तब्येत अस्वस्थ असल्यामुळे सिंधुदुर्गातून नितेश राणे यांना कोल्हापूर येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यावेळी आपल्या हत्येचा कट रचण्यात आला होता, असा दावा नितेश राणे यांनी केला आहे.