
मुंबई – पावसाळा तोंडावर आला आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईतील अनेक भागांमध्ये पाणी शिरतं. त्यामुळे मुंबईची (Mumbai) अक्षरशः तुंबई (Flood) होऊन पावसाळ्यामध्ये लोकांचे अतोनात हाल होतात. याबाबत भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी राज्य सरकारवर आणि मुंबई महापालिकेवर (BMC) खोचक टीका केली आहे.
आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, दरवर्षी आमच्या मुंबईची तूंबई होते आणि तशीच ओळख सत्ताधारी शिवसेनेने करून ठेवली आहे. दरवर्षी पावसाळ्यामध्ये मुंबईकरांचे हकनाक जीव जातात. काही ठेकेदारांच्या मर्जीसाठी रंगरंगोटीच्या कामापलीकडे पालिका काहीच करत नाही असा आरोपही त्यांनी मुंबई पालिकेवर केला आहे.
मुंबईत ३८६ फ्लडींग पाईंट आहेत. तिथे पाण्याचा उपसा करण्यासाठी पंप देण्यापलिकडे आपण काय केले आहे? का यंदाही मुंबईला तुंबई म्हणून देश व जागतिक स्तरावर बदनाम करणार आहात? @mybmc @CMOMaharashtra @BJP4Maharashtra pic.twitter.com/vlo5v93ykI
— nitesh rane (@NiteshNRane) May 16, 2022
पुढे ते म्हणाले की, यंदा पाऊस चांगला पडणार अशी माहिती आहे. मग मुंबईचे जे 386 फ्लड पॉईंटवर नुसतं पाण्याचे पंप बसवून चालणार आहेत का? याने हा प्रश्न सुटणार आहे का? असा सवालही आमदार नितेश राणे यांनी सत्ताधाऱ्यांना केला आहे. राज्य सरकार आणि पालिका यासाठी काही धोरण आखणार आहे का? की फक्त मुंबईची तुंबई होते ही ओळख याही वर्षी जागतिक पातळीवर करणार आहात का? असा खोचक सवाल नितेश राणे यांनी यावेळी बोलताना केला.