शिवसैनिकावरील हल्ल्यानंतर सेना-भाजप वाद शिगेला, निवडणुकीच्या तोंडावर राणेंना अटक होणार का?

WhatsApp Group

२८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे. अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. तसं करायचं झाल्यास विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते. मात्र, सध्या विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे तात्काळ आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड झाल्यास त्यांच्या परवानगीनंतर नितेश राणेंना अटक होणार का? हे पाहणं महत्वाचं असेल.

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन अखेरच्या टप्प्यात आलं असताना शिवसेना आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्यातील राजकीय युद्धामुळे तळकोकणातलं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. शिवसैनिक संतोष परब यांच्यावर आठवडाभरापूर्वी सिंधुदुर्गात जीवघेणा हल्ला झाला. याप्रकरणी काही हल्लेखोरांना अटकदेखील झाली. मात्र, या हल्ल्याचे खरे सुत्रधार भाजप आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी शिवसेनेनं केली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या तोंडावर केंद्रीय मंत्र्यांच्या दबावामुळे या प्रकरणातील खऱ्या सुत्रधारांची नावं लपवली जात असतील, तर शिवसेना शांत राहणार नाही, असा इशाराही सेनेनं दिला आहे. शनिवारी नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची कणकवली पोलीस ठाण्यात कसून चौकशी झाली. त्यानंतर तिसऱ्यांदा राणेंना चौकशीसाठी बोलावण्यात आलं, मात्र ते गैरहजर होते. तेव्हापासून अटकेची टांगती तलवार असताना नितेश राणे सध्या नॉट रिचेबल आहेत.

दरम्यान, २८ डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाची सांगता होणार आहे. अधिवेशन काळात आमदाराला अटक करता येत नाही. तसं करायचं झाल्यास विधानसभा अध्यक्षांची परवानगी आवश्यक असते. मात्र, सध्या विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. त्यामुळे तात्काळ आवाजी मतदानाने अध्यक्षांची निवड झाल्यास त्यांच्या परवानगीनंतर नितेश राणेंना अटक होणार का? हे पाहणं महत्वाचं असेल. सुडाच्या राजकारणातून नितेश राणेंना अटक करण्याच्या प्रयत्नात महाविकास आघाडी असल्याचा आरोप भाजप नेते नारायण राणे यांनी केला आहे.

समृद्धी पॅनेलच्या माध्यमातून महाविकास आघाडीचे सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असा थेट सामना रंगला आहे. यासाठी ३० डिसेंबरला मतदान तर ३१ डिसेंबरला मतमोजणी आहे. नारायण राणेंचा बालेकिल्ला असलेल्या सिंधुदुर्गात ही निवडणूक होत असल्यानं त्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सध्या शिवसेनेचे सतीश सावंत सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष आहेत. संतोष परब हे त्यांचे निकटवर्तीय आणि करंजे गावचे माजी सरपंच असल्यानं या प्रकरणात शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. परब यांच्यावरील हल्लाप्रकरणात मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला दिल्लीतून अटक करण्यात आली. हा आरोपी नितेश राणे यांच्या स्वाभिमानी संघटनेचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणेंवरही राजकीय वर्तुळातून आरोपांच्या फैरी झडत आहेत.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपच्या वर्चस्वाची चिन्ह असल्यानंच गोवण्याच्या प्रयत्न होत असल्याचा आरोप राणेंनी केला आहे. राणेंच्या अटकेसाठी सिंधुदुर्ग ते मुंबई वाया गोवा पोलिसांनी फिल्डिंग लावल्याची सध्या चर्चा आहे. ऐन जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संतोष परब हल्लाप्रकरणात त्यांच्या पुत्राला तुरुंगांची हवा खावी लावेल का? याबाबत सध्या तर्कवितर्क लावले जात आहे.