
वस्तू आणि सेवा कराच्या अनुदानाची 86,912 कोटींची रक्कम केंद्र सरकारने मंगळवारी राज्यांना वितरित केली. यापैकी महाराष्ट्राच्या वाटय़ाला सर्वाधिक 14,145 कोटी रुपये आले आहेत. राज्याची 26,500 कोटींची थकबाकी असल्याचा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अलीकडेच केला होता. यानुसार अद्यापही 12 हजार कोटींची राज्याची थकबाकी केंद्राकडे कायम आहे.
तर राज्यांची नुकसानभरपाईची सर्व रक्कम वितरित केल्याचा दावा केंद्राने केला आहे. केंद्राकडून जारी करण्यात आलेल्या या आकडेवारीवरुन आरोप प्रत्यारोप केले जात असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या प्रकरणावरुन प्रतिक्रिया देताना 50 टक्के पैसे अद्याप केंद्राकडे शिल्लक असल्याचं म्हटलंय. मात्र आता याच प्रतिक्रियेवरुन भाजपाचे नेते आणि माजी खासदार निलेश राणेंनी अजित पवारांना टोला लगावत त्यांचा फायनान्स हा विषय कच्चा असल्याचा शाब्दिक चिमटा काढला आहे.
“केंद्राकडून काल जीएसटीचे 14 हजार 150 कोटी रुपये मिळालेले आहेत. अजून 15 हजार कोटी रुपये राहिलेले आहेत. ते पण मिळवण्यासाठी आमचा पाठपुरवठा सुरु आहे,” असं अजित पवार यांनी या निधीसंदर्भात पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना बुधवारी सांगितलं.
अजित पवार म्हणतात GSTचे 50% पैसे मिळाले अजून 15 हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र 5 लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या 30/40 हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) June 1, 2022
अजित पवारांच्या याच वक्तव्यावरुन निलेश राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. अजित पवार म्हणतात GSTचे 50% पैसे मिळाले अजून 15 हजार कोटी शिल्लक आहे. मला अजित पवारांची नवल वाटते, महाराष्ट्र 5 लाख कोटींचं मोठं व प्रगत राज्य पण GSTच्या 30/40 हजार कोटींवर चर्चा होते यावरून लक्षात येते अजित पवारांचा finance विषय कच्चा आहे. बुद्धिवान माणसाकडे हे खातं असावं. असा टोला निलेश राणेंनी ट्विट करत लागवला आहे.