मेडिकल व्यावसायिक हत्येच्या तपासासाठी ‘एनआयए’चे पथक अमरावतीमध्ये दाखल

WhatsApp Group

अमरावती – गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीमध्ये दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे.

त्यांनी शुक्रवारी शहर कोतवाली पोलीस ठाणे गाठून संबंधितांकडून त्या घटनेची संपूर्ण माहिती घेतली तथा अटक आरोपींचीही झाडाझडती घेतल्याचं सांगण्यात आले. मात्र, पोलिसांनी याबाबत अधिकृत दुजोरा दिला नाही.

‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असं ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्यामुळे येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नूपुर शर्मा वादाशी संबंधित आहे का? याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी केली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांकडून तपासही करण्यात आला. मात्र, कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध नसल्याचा निर्वाळा अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला.