ऑस्ट्रेलिया बनला ‘टी२०’ चा नवा चॅम्पियन, फायनलमध्ये न्यूझीलंडला हरवून रचला इतिहास

WhatsApp Group

दुबई –  आयसीसी टी20 विश्वचषक 2021 चा अंतिम सामना ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात खेळण्यात आला. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा आठ गडी राखून पराभव करत पहिल्यांदाच टी20 विश्वचषकाचे विजेतेपद आपल्या नावावर केले आहे.

अंतिम सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या न्यूझीलंडसाठी कर्णधार केन विल्यमसनने 48 चेंडूत 85 धावांची शानदार खेळी केली. तर मार्टिन गप्टिल 28, ग्लेन फिलिप्स 18 तर जेम्स नीशमने 13 धावांची खेळी केली. या फलंदाजांच्या खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 173 धावांचे आव्हान दिले होते. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड दमदार गोलंदाजी करत 16 धावा देत 3 विकेट्स घेतल्या. तर अ‍ॅडम झम्पाला 1 विकेट घेण्यात यश आले.


ऑस्ट्रेलिया संघाकडून फलंदाजी करताना मिचेल मार्शने 50 चेंडूत 77 धावांची शानदार खेळी खेळली आणि यादरम्यान त्याने 6 चौकार आणि 4 षटकार ठोकले. तर डेव्हिड वॉर्नरनेही 38 चेंडूत 53 धावा करत न्यूझीलंडच्या पराभवाचत मोलाचा वाटा उचलला.

ऑस्ट्रेलियाला 6 वर्षांनंतर मिळाली ट्रॉफी

एकदिवसीय क्रिकेटमध्ये अनेकवेळा चॅम्पियन ठरलेला ऑस्ट्रेलिया पहिल्यांदाच टी-20 विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. विशेष म्हणजे तब्बल 6 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला आयसीसी ट्रॉफी मिळाली आहे. शेवटच्या वेळी त्याने 2015 चा विश्वचषक जिंकला होता, जो 50 षटकांचा विश्वचषक होता. त्यानंतर 2019 च्या विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला फक्त उपांत्य फेरी गाठता आली. पण 2021 चा टी-२० विश्वचषक जिंकत ऑस्ट्रेलियाने ही सगळी कसर भरुन काढली आहे.