इंग्लंडला पराभवाचा धक्का देत न्यूझीलंड टी20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत दाखल

WhatsApp Group

अबुधाबी – टी 20 विश्वचषकाच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने ५ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला आहे. न्यूझीलंडने हा सामना जिंकत टी 20 विश्वचषकाच्या अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. न्यूझीलंडसाठी डॅरिल मिशेलने ७२ धावांची शानदार नाबाद खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

खेळल्या गेलेल्या या सामन्यात इंग्लंडने न्यूझीलंडला विजयासाठी 167 धावांचे लक्ष्य दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना न्यूझीलंड संघाकडून खराब सुरवात झाली. सुरुवातीलाच कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गुप्टिल स्वस्तात बाद झाले. या खराब सुरुवातीनंतरही जेम्स नीशम आणि डॅरिल मिशेलच्या वादळी खेळींच्या जोरावर न्यूझीलंडने दमदार पुनरागमन करत हा सामना जिंकला.


इंग्लंडविरुद्धच्या या विजयामुळे न्यूझीलंड संघाने आयसीसी वनडे विश्वचषक २०१९ मधील झालेल्या पराभवाची परतफेड केली आहे. विशेष म्हणजे न्यूझीलंड संघाने प्रथमच आयसीसी टी२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात धडक मारली आहे.

न्यूझीलंड सघासाठी डॅरिल मिशेल नाबाद ७२ धावांची शानदार खेळी केली. तर डेव्हन कॉनवेने ४६ आणि जेम्स नीशमने ११ चेंडूत २७ धावा करत त्याला चांगली साथ दिली. इंग्लंडकडून लियाम लिव्हिंगस्टोन आणि ख्रिस वोक्सने प्रत्येकी २ विकेट्स तर आदिल रशीदने १ विकेट घेतला.


प्रथम फलंदाजी केलेल्या इंग्लंड संघासाठी मोईन अलीने नाबाद ५१ धावांची खेळी केली तर डेव्हिड मलानने ४२ धावांची खेळी केली. या दोघांच्या जोरावर इंग्लंडचा संघ न्यूझीलंड समोर १६७ धावांचे आव्हान उभारू शकला. न्यूझीलंडकडून टिम साऊदी, अ‍ॅडम मिल्ने, ईश सोधी आणि जेम्स नीशम यांनी प्रत्येती १ विकेट घेतला.

आयसीसी T20 विश्वचषक २०२१ च्या दुसऱ्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात लढत होणार आहे. यात जो संघ जिंकेल तो न्यूझीलंडसोबत अंतिम सामना खेळेल. या स्पर्धेचा अंतिम सामना हा रविवारी १४ नोव्हेंबरला खेळला जाणार आहे.