Nepal Plane Crash : नेपाळमध्ये प्रवासी विमान कोसळले, 16 जणांचा मृत्यू

WhatsApp Group

नेपाळमधील पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळावर 72 आसनी विमान कोसळले आहे. येथे भीषण अपघात झाला आहे. अपघातानंतर विमान जळू लागले आणि आकाशात धुराचे लोट पसरले. माहिती मिळताच रेस्क्यू टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचली आणि बचावकार्य सुरू केले. नेपाळ लष्कराच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याची भीती व्यक्त होत आहे. उतरण्यापूर्वी टेकडीवर आदळल्याने हा अपघात झाला. विमानतळ सध्या बंद आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात 5 भारतीय प्रवाशांचाही समावेश होता.

विमानात 72 लोक होते

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, यति एअरलाइन्सचे विमान कोसळले आहे. विमानात 68 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स होते. पोखरा आंतरराष्ट्रीय विमानतळ ते जुने विमानतळ दरम्यान ही घटना घडली. यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन यांनी विमान अपघाताच्या माहितीला दुजोरा दिला आहे.

यती एअरलाईन्सचे प्रवक्ते सुदर्शन यांनी सांगितले की, विमान कोसळल्यापासून बचावकार्य सुरू आहे. किती लोकांच्या जीवाला धोका आहे, हे सांगणे सध्या कठीण आहे. त्याच्या माहितीसाठी प्रतीक्षा करावी लागेल. किती लोक वाचले किंवा जखमी झाले हे आम्हाला माहीत नाही. विमान अपघातानंतर लागलेली आग विझवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेनंतरचे भयानक दृश्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये लोक आग विझवताना दिसत आहेत.

नेपाळमध्ये गेल्या 30 वर्षांत अशा 30 दुर्घटना घडल्या आहेत ज्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मे 2022 मध्ये, नेपाळमधील पोखरा येथे तारा एअरलाइन्सचे विमान कोसळले, ज्यामध्ये 22 लोकांचा मृत्यू झाला होता.