क्रीडा विश्वात खळबळ: ‘मला आणि कुटुंबाला शिवीगाळ केली’; नीरज चोप्रासह सुमित अंतिलचे प्रशिक्षकावर गंभीर आरोप, सरकारकडे तक्रार!
भारतीय भालाफेक (Javelin Throw) क्षेत्रातील दोन मोठे दिग्गज – ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा आणि पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल – यांनी एका भारतीय प्रशिक्षकाविरुद्ध आघाडी उघडली आहे. प्रशिक्षक नवल सिंह यांच्यावर मानसिक छळ आणि अत्यंत खालच्या थराची भाषा वापरल्याचे खळबळजनक आरोप या खेळाडूंनी केले असून, क्रीडा क्षेत्रात यामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण? ‘द ब्रिज’च्या अहवालानुसार, नीरज चोप्रा, सुमित अंतिल आणि इतर काही भालाफेकपटूंनी भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) कडे लेखी तक्रार दाखल केली आहे. प्रशिक्षक नवल सिंह हे दारूच्या नशेत खेळाडूंना शिवीगाळ करत असल्याचे रेकॉर्डिंग पाठवतात, असा आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नवल सिंह केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर त्यांच्या कुटुंबीयांनाही अत्यंत गलिच्छ भाषेत टोमणे मारत असल्याचे समोर आले आहे.
सुमित अंतिलची मुख्य तक्रार या प्रकरणातील मुख्य तक्रारदार सुमित अंतिल आहे. सुमितने यापूर्वीही भारतीय पॅरालिम्पिक कमिटी आणि ‘साई’कडे तोंडी तक्रार केली होती, परंतु परिस्थितीत बदल न झाल्याने त्याने १० एप्रिल रोजी लेखी तक्रार दिली. सुमितने आपल्या तक्रारीत म्हटले आहे की, “मला वादात पडायला आवडत नाही, परंतु वारंवार होणाऱ्या या अपमानजनक वागणुकीकडे आता दुर्लक्ष करणे अशक्य आहे.” नवल सिंह सध्या उदयोन्मुख खेळाडू सचिन यादवला प्रशिक्षण देत आहेत.
नीरज चोप्राचा कडक शब्दांत प्रहार भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राने सुमितच्या आरोपांना पूर्ण पाठिंबा दिला आहे. नीरजने या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त करत प्रशिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. नीरजने आपल्या पत्रात लिहिले आहे की, “नवल सिंह यांनी केलेली विधाने आणि दिलेली वागणूक केवळ अयोग्य नसून अत्यंत लाजिरवाणी आहे. माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि सहकारी खेळाडूंसाठी वापरलेली अभद्र भाषा ही व्यावसायिक शिष्टाचाराच्या पूर्णपणे विरोधात आहे.”
क्रीडा प्राधिकरणाकडून चौकशीची शक्यता देशातील दोन सर्वोच्च पदकविजेत्या खेळाडूंनी थेट प्रशिक्षकावर आरोप केल्यामुळे क्रीडा मंत्रालय आणि ‘साई’ या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत आहे. प्रशिक्षकाचे हे वर्तन खेळाडूंच्या मानसिकतेवर परिणाम करणारे असून, अशा प्रकारच्या गैरवर्तणुकीमुळे भारतीय क्रीडा क्षेत्राच्या प्रतिमेला तडा जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
