नीरज चोप्रानं रचला इतिहास, जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत मिळवले रौप्यपदक

WhatsApp Group

Neeraj Chopra At The World Athletics Championships : यूजीन, यूएसए येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील (World Athletics Championships) भालाफेक स्पर्धेत नीरज चोप्राचे (Neeraj Chopra) सुवर्णपदक हुकले. त्याने 88.13 मीटर भालाफेकसह रौप्यपदक जिंकले. अँडरसन पीटर्सने  (Anderson Peters) सुवर्णपदक जिंकले. पीटर्सने सहापैकी तीनही प्रयत्नांत 90 मीटर अंतरावर भाला फेकला.

येथे दुसऱ्या स्थानावर असूनही नीरजने इतिहास रचण्यात यश मिळवले. जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा तो भारताचा पहिला पुरुष खेळाडू ठरला आहे. एकूणच, या चॅम्पियनशिपच्या 39 वर्षांच्या इतिहासात पदक जिंकणारा तो दुसरा भारतीय खेळाडू आहे. त्याच्या आधी भारताची महिला धावपटू अंजू बेबी जॉर्ज हिने लांब उडीत पदक जिंकले होते. अंजूने 2003 च्या जागतिक ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकले होते.

नीरजने येथे फाऊल थ्रोने सुरुवात केली आणि दुसऱ्या प्रयत्नात 82.39 मी. फेक करून अंतिम फेरीत तो पिछाडीवर होता. यानंतर तो तिसऱ्या प्रयत्नात 86.37 मीटर फेक करून चौथा तर चौथ्या प्रयत्नात 88.13 मीटर फेक करून दुसरा क्रमांक पटकावला. नीरजचा पाचवा प्रयत्न फाऊल होता आणि शेवटच्या प्रयत्नात ९० मीटरच्या पुढे भाला फेकता येत नसल्याचे लक्षात येताच त्याने हा प्रयत्नही फाऊल केला.

अँडरसन पीटर्ससमोर नीरज कुठेच थांबू शकला नाही. पीटर्सने पहिल्या फेरीत 90.21 मीटर, दुसऱ्या फेरीत 90.46 मीटर, तिसऱ्या फेरीत 87.21 मीटर आणि चौथ्या फेरीत 88.12 मीटर भालाफेक केली. त्याच्या शेवटच्या फेरीत, त्याने 90.54 मीटर अंतरावर भालाफेक करून हे सिद्ध केले की तो सध्या भालाफेकमध्ये जगातील नंबर 1 खेळाडू आहे.

भारताचा आणखी एक खेळाडू रोहित यादवही भालाफेकच्या अंतिम स्पर्धेत नशीब आजमावत होता. मात्र रोहित यादवला तीन प्रयत्नांनंतरच अंतिम फेरीतून बाहेर पडावे लागले. पहिल्या तीन प्रयत्नांनंतर तो 10व्या क्रमांकावर होता. त्यामुळे त्याला बाहेर काढण्यात आले.