काकांच्या हातातून सगळचं निसटलं! राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह पुतण्याकडे

WhatsApp Group

राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हावर आज निकाल जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाने याबाबत अतिशय मोठा आणि ऐतिहासिक असा निर्णय दिला आहे. या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि घड्याळ चिन्ह देण्यात आलं आहे. अजित पवार गटासाठी हा सर्वात मोठा दिलासा आहे. अजित पवार यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच मिळाला आहे. दुसरीकडे आगामी राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने विशेष मुभा दिली आहे. शरद पवार गटाला आता निवडणूक आयोगाला उद्यापर्यंत नवं नाव आणि नव्या चिन्हाचा प्रस्ताव पाठवावा लागणार आहे. शरद पवार यांच्या गटाला निवडणूक आयोगाकडून स्वतंत्र गटाची मान्यता देण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निकालाची गेल्या अनेक दिवसांपासून प्रतिक्षा होती. निवडणूक आयोगाच्या सुनावणीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे स्वत: हजेरी लावताना बघायला मिळाले. याशिवाय त्यांच्या गटाचे दिग्गज नेते या सुनावणीला हजर राहत होते. निवडणूक आयोग शिवसेनेच्या निकालापेक्षा वेगळा निकाल देईल, असा अंदाज बांधला जात होता. कारण शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे हयात नाहीत. पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे हयात आहेत. याशिवाय ते प्रत्यक्ष सुनावणीला हजेरी लावत होते. त्यामुळे निवडणूक आयोगाचा निकाल काय येईल? याबाबत उत्सुकता होती. पण निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या निकालासारखाच निकाल दिला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे महाविकास आघाडीचं अडीच वर्षांचं सरकार पडलं. त्यानंतर राज्यात सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हातून शिवसेना पक्ष आणि त्याचं चिन्ह गेलं. निवडणूक आयोगात याप्रकरणी सविस्तर सुनावणी पार पडल्यानंतर हा निकाल देण्यात आला होता. त्यानंतर वर्षभरात म्हणजे गेल्या वर्षी 2 जुलैला महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा भूकंप घडून आला होता. कारण अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंड पुकारलं होतं.

केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, आयोगाने हा निर्णय बहुमताच्या आधारे घेतला. राष्ट्रीय पातळीवर विचार करता नागालँडमध्ये निवडणून आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी अजित पवार यांनाच पाठिंबा दिला आहे. शिवाय पक्षातील बहुतांश आमदार खासदार यांचाही पाठिंबा अजित पवार यांनाच आहे. याकडे लक्ष वेधत शिवसेना पक्षाच्या बाबतीत जो निवाडा उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत झाला, तसाच निवाडा या प्रकरणातही देण्यात आला.

‘शिवसेनेसोबत जे केलं ते आमच्यासोबत केलं’ – सुप्रिया सुळे

शिवसेनेसोबत जे काही केले, तेच आमच्यासोबत केले, असे खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. शरद पवार यांनी राष्ट्रवादीची सुरुवात शून्यातून केली. त्याच्या मागे कोणी काका किंवा आजोबा नव्हते. निवडणूक आयोगाच्या निर्णयात अदृश्य शक्तीचा हात आहे. आमदारांच्या संख्येवरून पक्ष ठरवला जात नाही. अदृश्य शक्तीचा विजय झाला. आम्ही पुन्हा उभे राहू.