औरंगाबाद – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राज्यातील राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारला इशारा दिला आहे. ३ मे पर्यंत भोंगे खाली उतरवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. यानंतर राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे १ मे रोजी जाहीर सभा घेणार असल्याची घोषणा केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेच्या नियोजनासाठी मनसेकडून तयारी करण्यात येत आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने या सभेला विरोध केला आहे.
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेला वंचित बहुजन आघाडी आणि मंत्री बच्चू कडू यांच्या प्रहारसह ५ संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही सभेला विरोध केला आहे. राज ठाकरेंच्या सभेला परवानगी नाकारावी, अशी मागणी राष्ट्रवादी अल्पसंख्यांक सेलकडून करण्यात आली आहे.
रमजानचा महिना सुरू आहे. राज ठाकरे यांच्या सभेमुळे जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, असं राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलने म्हटले आहे. हिजाब गर्ल मुस्कान खान हिच्या औरंगाबादमधील सत्कार सभेला जशी परवानगी नाकारली गेली, तशीच राज ठाकरे यांच्या सभेलाही परवानगी नाकारण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या अल्पसंख्यांक सेलकडून करण्यात आली आहे.