NCP leader Baba Siddique Shot Dead : राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांची मुंबईत गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. बाबा सिद्दीकी यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या, त्यानंतर त्यांना लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. सिद्दीकी यांचा मुलगा झीशान सिद्दीकी याच्यावर वांद्रे खेरवाडी सिग्नल येथील कार्यालयाजवळ गोळीबार करण्यात आला. लीलावती रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. बाबा सिद्दीकी हे महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठे नाव आहे. ते तीन वेळा आमदार राहिले आहेत.
सहा राऊंड गोळीबार
वांद्रे पूर्वेतील बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. घटनेची माहिती मिळताच मुंबई गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी दोन शूटर्सना अटक करण्यात आली आहे. सिद्दीकी यांच्यावर सहा राऊंड गोळीबार केला, ज्यामध्ये त्यांना तीन गोळ्या लागल्या.
बाबा सिद्दीकी यांनी 15 दिवसांपूर्वी आपल्या जीवाला धोका असल्याची माहिती दिली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना याबाबत माहिती दिली होती. त्यानंतर त्यांना केंद्र सरकारकडून Y दर्जाची सुरक्षा देण्यात आली होती. सिद्दीकी यांच्या मृत्यूने आता सुरक्षेवरच प्रश्नचिन्ह व्यक्त करण्यात आलं आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
बाबा सिद्दिकी यांच्यावरील गोळबारानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.
“बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार झाल्याची ही घटना अतिशय दुर्दैवी आहे. या हल्ल्यासंदर्भात तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत. दोन आरोपी पकडण्यात आले आहेत.
एक हरियाणाचा आहे आणि एक उत्तर प्रदेशचा आहे. तिसरा आरोपी फरार आहे. त्याचा तपास पोलिसांकडून शोध सुरु आहे,” असं शिंदे म्हणाले.
सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा – शरद पवार
राज्याची कोलमडलेली कायदा सुव्यवस्था चिंता वाढवणारी आहे. देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईत माजी राज्यमंत्री बाबा सिद्दिकी यांच्यावर झालेला गोळीबार खेदजनक आहे. गृहमंत्री आणि सत्ताधारी एवढ्या सौम्यतेने राज्याचा गाडा हाकणार असतील तर सामान्य जनतेसाठी धोक्याची घंटा ठरू शकते. याची केवळ चौकशीच नको तर जबाबदारी स्वीकारून सत्ताधाऱ्यांनी आपल्या पदावरून पायउतार होण्याची गरज आहे. बाबा सिद्दिकी यांच्याप्रती भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करतो.
माझा चांगला सहकारी, मित्र गमावला – अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी राज्यमंत्री, विधिमंडळात प्रदीर्घकाळ राहिलेले माझे सहकारी बाबा सिद्दीकी यांच्यावर झालेल्या गोळीबाराची घटना अत्यंत दुर्दैवी, निषेधार्ह आणि वेदनादायी आहे. या घटनेत त्यांचं निधन झाल्याचं समजून मला धक्का बसला. मी माझा चांगला सहकारी, मित्र गमावला आहे. या भ्याड हल्ल्याचा मी तीव्र शब्दात निषेध करतो. बाबा सिद्दीकी यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
या घटनेची सखोल चौकशी करुन हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यात येईल. हल्ल्यामागचा सूत्रधारही शोधण्यात येईल. बाबा सिद्दीकी यांच्या निधनामुळे अल्पसंख्याक बांधवांसाठी लढणारा, सर्वधर्मसमभावासाठी प्रयत्न करणारा एक चांगला नेता आपण गमावला आहे. त्यांचं निधन हे राष्ट्रवादी काँग्रेसचं मोठं नुकसान आहे. झिशान सिद्दीकी, सिद्दकी कुटुंबिय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही – विजय वडेट्टीवार
राज्य शासनाची Y दर्जाची सुरक्षा असताना माजी राज्यमंत्री, माजी आमदार बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करून त्यांची हत्या झाल्याची घटना अतिशय धक्कादायक आणि दुःखद आहे.बा बा सिद्दिकी यांनी राज्यमंत्री म्हणून काम केले आहे. काँग्रेस पक्षात असताना सहकारी म्हणून आम्ही पक्षासाठी सोबत काम केले आहे. बाबा सिद्दिकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाला बळ हीच प्रार्थना. राज्यातील मोठ्या नेत्यावर असा गोळीबार होतो. महाराष्ट्राचा उत्तर प्रदेश झाला आहे असं आम्ही सतत सांगतोय. मुंबई शांत होती पण अलीकडे मुंबईत या घटना वाढत आहे. मुंबईत पोलिसांचा धाक उरला नाही कारण या सरकारनेच गुन्हेगारांना पाठीशी घातले आहे. गुन्हेगारांना सरकार वाचवते, एवढ्या मोठ्या नेत्यावर गोळीबार होतो ही गंभीर बाब आहे याची चौकशी झाली पाहिजे.