समीर वानखेडेंना मोठा धक्का, आर्यन खानचा तपास घेतला काढून

WhatsApp Group

मुंबई – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खान प्रकरणाचा तपास काढून घेण्यात आला आहे. वानखेडेंवर वेगवेगळे आरोप झाल्यानंतर एनसीबीकडून हा निर्णय घेण्यात आला आहे.

एनसीबीच्या महासंचालकांनी ड्रग्जशी संबंधित 6 प्रकरणांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) तयार केले आहे, ज्यात मुंबई झोनल युनिटकडे असलेल्या क्रूझ प्रकरणाचाही समावेश आहे. एसआयटीचे प्रमुख म्हणून एनसीबीच्या ऑपरेशन्स विंगचे उपमहासंचालक (डीडीजी) संजय सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वानखेडेसह त्यांच्या तपास पथकातील सर्व अधिकारी या प्रकरणांशी संबंधित असले तरी आता ते आयपीएस संजय सिंह यांच्या निर्देशांचे पालन करतील.

वानखेडे यांच्या हकालपट्टीचे वृत्त समोर आल्यानंतर डीडीजींनी अधिकृत निवेदन जारी करून परिस्थिती स्पष्ट केली. ते म्हणाले की, सध्याच्या भूमिकेतून एकाही अधिकाऱ्याला हटवले नाही. ते ऑपरेशन विंगच्या तपास पथकाला मदत करतील. त्याच वेळी, एनसीबीचे दक्षिण पश्चिम क्षेत्राचे उपमहानिदेशक मुथा अशोक जैन म्हणाले की, आता दिल्लीची टीम आर्यनसह एकूण 6 प्रकरणांची चौकशी करेल.

वसुलीसह बनावट जात प्रमाणपत्र बनवण्याच्या आरोपानंतर समीर वानखेडे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. एनसीबीचे वरिष्ठ अधिकारीही या प्रकरणाचा तपास करत आहेत. वसुली प्रकरणाचा तपास करत असलेले एनसीबीचे डीडीजी ज्ञानेश्वर सिंह सोमवारी पुन्हा दिल्लीहून मुंबईत येत आहेत.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाच्या तपासातून काढून टाकल्यानंतर वानखेडे म्हणाले की, मला तपासातून हटवण्यात आलेले नाही. या प्रकरणाची केंद्रीय एजन्सीमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी माझी न्यायालयात रिट याचिका होती. त्यामुळे आर्यन प्रकरण आणि समीर खान (नवाब मलिक यांचा जावई) यांचा तपास दिल्ली एनसीबीची एसआयटी करत आहे.

वानखेडेवर 8 कोटींची लाच घेतल्याचा आरोप

प्रतिज्ञापत्रात, कथित खाजगी तपासनीस आणि एनसीबीचे साक्षीदार केपी गोसावी यांचे अंगरक्षक प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडेवर 8 कोटी रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. प्रभाकरने दावा केला की गोसावी आणि सॅम डिसोझा यांच्यामध्ये १८ कोटी रुपयांबद्दल बोलताना मी ऐकले होते आणि १८ कोटी रुपयांमध्ये डील झाली होती.

गोसावी आणि सॅम यांनी NCB अधिकारी समीर वानखेडे यांना 18 पैकी 8 कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. केपी गोसावी यांच्याकडून ही रोकड घेऊन सॅम डिसोझा यांना दिल्याचेही प्रभाकरने म्हटले आहे. पंचनाम्याचे कागद सांगून 10 कोऱ्या कागदांवर जबरदस्तीने सही केल्याचे प्रभाकरने सांगितले होते.