पाणी प्रश्न सोडवा, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्या आणि नंतर सभा घ्या; नवनीत राणांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

अमरावती – आज औरंगाबादमध्ये शिवसेनेची (Shivsena) जाहीर सभा होणार आहे. शिवसेनेने गेल्या काही दिवसापासून तयारी सुरू केली आहे. या सभेवरुन आता भाजपने आरोप-प्रत्यारोप सुरू केले आहेत. यावरुन आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. ‘अगोदर औरंगाबाद शहरातील पाणी प्रश्न सोडवा नंतर जाहीर सभा घ्या’, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.
अमरावतीच्या खडीमल गावातील पाणी टंचाईच भीषण वास्तव समोर आले आहे. खरतर मेळघाटसह अनेक गावांमध्ये पाणी टंचाई आहे. हाच मुद्दा घेऊन अमरावतीच्या खासदार नवनीत राणांना ट्रोल करण्यात आले होते. यावर नवनीत राणांनी आता थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना प्रश्न उपस्थित केला आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबाद येथे सभा होते. याच सभेवरुन खासदार नवनीत राणा यांनी आगोदर औरंगाबाद मधील पाणी प्रश्न सोडवा, नागरिकांचे प्रश्न जाणून घ्या. नंतर सभा घ्यावी असा, टोला लगावला आहे.
राज्यसभेवरुनही राणा यांनी मुख्यमंत्र्यांवर (Uddhav Thackeray) आरोप केले. अपक्ष आमदारच नाराज नाही, तर इतर अनेक पक्षातील अनेक आमदार नाराज आहेत. राज्यातले मंत्री टक्केवारी मागतात. आमदारांना मुख्यमंत्री मिळत नाहीत, त्यामुळे अपक्ष आमदारांसह राज्यातील अनेक आमदार नाराज आहेत, असंही राणा यावेळी बोलताना म्हणाल्या.