अमरावती: अमरावतीच्या माजी खासदार आणि भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रविवारी एका अज्ञात व्यक्तीने पोलीस नियंत्रण कक्षाच्या (डायल ११२) क्रमांकावर फोन करून नवनीत राणा यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याने पोलीस वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. “बाबा सिद्दिकींसारखीच तुमची हत्या करू,” असे या अज्ञात इसमाने फोनवर म्हटले असून, याप्रकरणी अमरावती पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
विवादास्पद वक्तव्यानंतर धमकीचा फोन
मिळालेल्या माहितीनुसार, नवनीत राणा यांनी अलीकडेच लोकसंख्येच्या मुद्द्यावर भाष्य करताना हिंदूंना अधिक मुले जन्माला घालण्याचे आवाहन केले होते. या वक्तव्याचा संदर्भ देत संबंधित धमकी देणाऱ्या व्यक्तीने संताप व्यक्त केला आहे. “नवनीत राणा आम्हाला हलक्यात घेत आहेत. जर त्यांना अधिक मुले हवी असतील, तर त्यांनी आम्हाला भेटायला यावे, त्यांचा परिणाम बाबा सिद्दिकींसारखा होईल,” अशी भाषा वापरत या इसमाने थेट पोलिसांनाच फोन केला. या प्रकारामुळे अमरावती पोलीस सतर्क झाले असून नवनीत राणा यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यात आली आहे.

धमक्यांचे सत्र सुरूच
नवनीत राणा यांना अशा प्रकारे धमकी मिळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांत त्यांना विविध मार्गांनी वारंवार धमक्या आल्या आहेत. यापूर्वी हैदराबादहून एका व्यक्तीने स्पीड पोस्टद्वारे धमकीचे पत्र पाठवून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला लक्ष्य करण्याची धमकी दिली होती. त्या पत्रातही अत्यंत अर्वाच्च आणि अश्लील भाषेचा वापर करण्यात आला होता. याशिवाय, त्यांना पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधूनही धमकीचे कॉल आल्याची नोंद पोलिसांकडे आहे.
तपासासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना
आजच्या घटनेनंतर राजापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तांत्रिक तपासाच्या आधारे ज्या मोबाईल क्रमांकावरून हा फोन आला होता, त्याचे लोकेशन शोधण्याचे काम सुरू आहे. “आम्ही या प्रकरणाला गांभीर्याने घेत आहोत आणि धमकावणाऱ्या व्यक्तीला लवकरच अटक केली जाईल,” असा विश्वास अमरावतीच्या पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. वारंवार मिळणाऱ्या या धमक्यांमागे नेमकी कोणती टोळी किंवा विचारसरणी आहे, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.
