कोकणी मतांची धुरा भाजपकडून खासदार नारायण राणे यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुंबई मनपा निवडणुकीसोबतच इतर काही महापालिका निवडणुकांमध्येही राणे प्रचारात उतरणार आहेत. ठाकरे गटाला शह देण्यासाठी नारायण राणेंची तोफ मुंबईत धडाडणार असून, याच अनुषंगाने त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
भाजपकडून मुंबईत नेहमीच वेगवेगळ्या समाजाच्या मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो. आगामी निवडणुकांमध्ये मुंबईतील कोकणी मतदारांना पूर्णपणे एकत्रित करण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जाणार आहे. खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर विविध प्रचार सभांची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही रणनीती मुंबईतील राजकीय समीकरणे बदलण्यासाठी महत्त्वाची ठरू शकते.
